नवी दिल्ली: मध्य प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आल्यानंतर काँग्रेसचे नाराज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यात्वाचा राजीनामा दिला आहे. आता ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील. ज्योतिरादित्यांना राजीनामा दिला असला तरी काँग्रेसने मात्र आपण त्यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर ज्योतिरादित्यांवर काँग्रेसनेते भडकले आहेत. ज्योतिरादित्यांवर टीका करताना कुणी त्यांना गद्दार म्हणत आहेत, तर कुणी त्यांना चयचंद असे म्हटले जात आहे.
काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचा उल्लेख गद्दार असा केला आहे. पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला हे फार बरे झाले अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी टीका करताना व्यक्त केली आहे. मात्र, ज्योतिरादित्यांच्या राजीनाम्यानंतर आता मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार टिकणार नाही असेही चौधरी यांनी मान्य केले.
गद्दारांची हकालपट्टी करावीच लागेल
जे पक्षाच्या विरोधात गद्दारी करतात त्यांची हकालपट्टी करावीच लागेल, असे चौधरी यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्ष आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या पक्षाला जर तुम्ही बळ देणार असाल तर पक्षाला त्या विरोधात कारवाई ही करावीच लागेल, असेही ते पुढे म्हणाले.
‘कठीण काळात पक्षाला सोडणे बेईमानी’
जेव्हा पक्ष कठीण काळात असतो तेव्हा तशा परिस्थिती पक्षाला सोडून जाणे ही बेईमानी आहे, अशा शब्दात चौधरी यांनी ज्योतिरादित्यांना टोला हाणला आहे. या मुळे पक्षाचे नुकसान होणारच आहे. कदाचित मध्य प्रदेशातील आमचे सरकार आता वाचणार नाही असे सांगताना विरोधी पक्षाला फोडणे हीच भारतीय जनता पक्षाचे राजकारण असल्याची टीकाही चौधरी यांनी केलीय.

अधिक वाचा  रोहित पवारांना MPCBची मध्यरात्री नोटीस अन् दुपारी हायकोर्टाकडून दिलाश्याचे बर्थ-डे गिफ्ट!