नवी दिल्लीः दिल्लीतील दंगलींवर लोकसभेत आज चर्चा होणार आहे. नियम १९३ नुसार ही चर्चा होणार असल्याने त्यावर मतदान होणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या चर्चेला उत्तर देणार आहेत. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी गेल्या आठवड्यात दिल्ली दंगलीवर चर्चेची मागणी लावून धरली होती. यासाठी त्यांनी संसदेच्या दोन्ही संभागृहांमध्ये गोंधळ घातला होता. त्यामुळे संसदेचं कामकाज अनेकदा तहकूब करावं लागलं होतं.
दिल्ली दंगलीच्या मुद्द्यावरून लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या सात खासदारांना गेल्या आठवड्यात निलंबित करण्यात आलंय. काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी आणि भाजपचे दिल्लीतील खासदार या चर्चेला सुरुवात करतील.
दिल्लीतील दंगलीसह काँग्रेसकडून मध्य प्रदेशातील राजकीय संकटाचा मुद्दाही उपस्थित करण्यात येण्याची शक्यता आहे. भाजपने भाडेतत्त्वार घेतलेल्या चार्टर्ड विमानांनी मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना बेंगळुरूला नेण्यात आले, असा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केलाय. आरोग्य आणि परराष्ट्र मंत्रालयांसह तीन मंत्रालयांच्या अनुदानाच्या मागण्यांवरही चर्चा होऊ शकते.