मुंबई  : मध्यप्रदेशातलं काँग्रेसचं सरकार संकटात सापडलं आहे. पक्षाला मोठं खिंडार पडलं असून ज्योतिरादित्य शिंदे यांच्या 21 समर्थक आमदारांनी राजीनामे दिलेत तर 6 मंत्र्यांची मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हकालपट्टी केली आहे. शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. काँग्रेसमधल्या असंतोषाचा फायदा भाजपने घेतला असून त्याचे पडसाद इतर राज्यांमध्येही उमटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, काँग्रेसला आपले नेते सांभाळता येत नाहीत. याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटणार असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिनही पक्षात बंडखोरी होणार असल्याचं भाकीत त्यांनी व्यक्त केलं.
आठवले म्हणाले, ज्योतिरादित्य शिंदे हे मराठी भाषिक आहेत, मुळचे महाराष्ट्रीयन आहेत. त्यांची आजी ही पूर्वी भाजपमध्येच होती. त्यामुळे त्यांनी घरवापसी केली आहे. भाजप ने फोडाफोडी नाही केली. काँग्रेसला त्यांच्या पक्षात नेते संभाळता येत नाहीत. उद्वव ठाकरे यांनी आमच्याकडं यावं. तसं झालं तर मजबूत सरकार राज्यात अस्तित्वात येईल. लवकरच तिनही पक्षांत बंडखोरी होणार असून महाराष्ट्रातला महाविकास आघाडीचा एक नेता संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटी त्यांनी केला.
मिलिंद देवराही नाराज?
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा हादरा बसला. मध्यप्रदेशात शिंदे घराण्याची एक वेगळी प्रतिष्ठा असल्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय. शिंदे यांच्या या बंडामुळे मध्यप्रदेशातलं कमलनाथ सरकार अल्पमतात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून ज्योतिरादित्य हे नाराज होते. पक्षात आपल्याला डावललं जातंय, काम करू दिलं जात नाही अशी त्यांची भावना होती. त्यामुळे त्यांनी थेट भाजपचा रस्ता धरला. आता त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवराही गेल्या काही महिन्यांपासून पक्षात नाराज आहेत. ज्योतिरादित्य यांच्याप्रमाणेच मिलिंद देवरासुद्धा राहुल गांधी यांच्या आतल्या वर्तुळातले होते. समवयस्क असल्याने त्यांचं राजकारणापलिकडचं नातं होतं. राहुल यांच्या अनेक विदेश दौऱ्यांमध्ये मिलिंद देवरा हे त्यांच्यासोबत होते. मात्र आता संदर्भ बदलल्याने काँग्रेसला आणखी हादरे बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पद सोडलं होतं. त्यानंतर सोनिया गांधी पुन्हा एकदा पक्षाध्यक्ष झाल्या. त्यानंतर पक्षात तरुण आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये संघर्ष पेटला आहे. ज्या नेत्यांमुळे पक्षाची ही अवस्था झाली त्या नेत्यांनी दूर झालं पाहिजे असं राहुल गांधी यांना वाटत होतं मात्र जुने लोक पदं सोडायला तयार नव्हते.
मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं. तर त्यांच्या एका ट्वीटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्तर दिलं होतं. त्यामुळे आता मिलिंद देवराही भाजपची वाट धरणार असल्याची चर्चा सुरू झालीय.

अधिक वाचा  मोठी बातमी: विशाळगडावरील अतिक्रमणविरोधी कारवाईला स्थगिती, हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावले