भोपाळ : मध्य प्रदेशमधल्या कमलनाथ सरकारवरचं संकट आणखी वाढलं आहे. ज्योतिरादित्य शिंधिया यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता मध्य प्रदेशमधल्या काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिला आहे. एंदल सिंग कंसाना आणि मनोज चौधरी या दोन्ही आमदारांनीही काँग्रेसचा हात सोडला आहे.
मध्य प्रदेशमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये सपा आमदार राजेश शुक्ला आणि बीएसपी आमदार संजीव कुश्वाहा यांनी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची भेट घेतली. दुसरीकडे बंगळुरुमध्ये काँग्रेसच्या १९ बंडखोर आमदारांना सुरक्षेचा प्रश्न सतावत आहे. त्यामुळे या आमदारांनी कर्नाटक डीजीपींना पत्र लिहून सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
काँग्रेस आमदार बिसाहू लालसिंग यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बंगळुरुमध्ये असलेल्या १९ आमदारांनीही राज्यपालांकडे राजीनामा पाठवला आहे. तर कमलनाथ यांनी राज्यपालांना पत्र लिहून ज्योतिरादित्य समर्थक ५ मंत्र्यांना पदावरून काढण्याची मागणी केली आहे.
राजीनामा देणारे २२ आमदार
रघुराज कंसाना, कमलेश जाटव, रक्षा संत्राव, जजपालसिंग जज्जी, सुरेश धाकड, ओपीएस भदौरिया, रणवीर जाटव, गिरराज दंडोतिया, जसवंत जाटव, हरदीप डंग, मुन्नालाल गोयल, बिजेंद्र यादव, राजवर्धन सिंग, एंदल सिंग कंसाना, मनोज चौधरी, बिसाहूलाल साहू, इमरती देवी, प्रभुराम चौधरी, तुलसी सिलावट, महेंद्रसिंग सिसोदिया, प्रद्युमनसिंग तोमर, गोविंद राजपूत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे आणखी ७ आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. आज रात्रीपर्यंत ७ आमदार विधानसभा अध्यक्षांकडे त्यांचा राजीनामा सोपवण्याची शक्यता आहे.
ज्योतिरादित्य शिंधिया आज संध्याकाळी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली. ज्योतिरादित्य शिंदिया यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे सोपावला. या राजीनाम्याची प्रत ज्योतिरादित्य शिंदिया यांनी त्यांच्या ट्विटरवरही शेयर केली आहे. जनसेवा करण्यासाठी मी राजकारणात आलो होतो, पण मागच्या काही काळापासून काँग्रेसमध्ये हे काम करता आलं नसल्याची खंत त्यांनी पत्रात मांडली आहे.

अधिक वाचा  ‘मातोश्री’च ‘कोथरूड’बाबत साशंक?; शहर प्रमुखाची ‘कानउघडणी’ अन् पदाधिकाऱ्यांची शाळा मोठा निर्णयही!