नवी दिल्ली: मध्य प्रदेशमधलं काँग्रेस सरकार कोसळ्याण्याच्या स्थितीत आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्ष नेतृत्वाकडे राजीनामा सोपवला आहे. यानंतर मध्य प्रदेशातल्या 22 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशात भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी झाल्याचं म्हटलं जात आहे.
आज सकाळी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी गृहमंत्री अमित शहादेखील उपस्थित होते. कोरोनामुळे होळी खेळणार नसल्याचं जाहीर करणाऱ्या मोदी यांनी मध्य प्रदेशात राजकीय भूकंप घडवत पॉलिटिकल होळी साजरी केल्याचं बोललं जात आहे. मोदी यांनी मध्य प्रदेशात काँग्रेसला धक्का देत 25 वर्षांपूर्वीच्या घटनेचा वचपा काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

1995 मध्ये गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. पहिल्यांदाच राज्यात भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. 182 सदस्य संख्या असलेल्या गुजरात विधानसभेत भाजपचे 121 उमेदवार निवडून गेले. या निवडणुकीची रणनीती नरेंद्र मोदींनी आखली होती. त्यामुळे भाजपच्या नेत्रदीपक यशात त्यांचा मोठा वाटा होता. मोदींच्या अचूक रणनीतीला शंकरसिंह वाघेला यांच्या आक्रमकतेची आणि केशुभाई पटेल यांच्या लोकप्रियतेची साथ मिळाली.

अधिक वाचा  सद्गुरू नारायण महाराज यांचे निधन; 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; ४ वाजता यज्ञ कुंडाजवळ अग्नी संस्कार

भाजपमधलं सर्वात मोठं बंड

केशुभाई पटेल यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली. त्यानंतर भाजपमध्ये सर्वात मोठं बंड झालं. पटेल यांनी मुख्यमंत्री केल्याने वाघेला नाराज झाले आणि पक्षाच्या 45 पेक्षा अधिक आमदारांना घेऊन मध्य प्रदेशातल्या खजुराहोमध्ये गेले. या आमदारांना त्यावेळी खजुरियाज म्हटलं गेलं. तर भाजपसोबत राहिलेल्या आमदारांना हजुरियाज (एकनिष्ठ) म्हटलं गेलं.

दिग्विजय सिंह यांची भूमिका काय?

शंकरसिंह वाघेला 45 पेक्षा अधिक आमदारांसह मध्य प्रदेशातल्या एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार होतं. दिग्विजय सिंह त्यावेळी मुख्यमंत्री होते. भाजपने वाघेला यांचं बंड मोडून काढू नये, भाजप आमदारांची घरवापसी होऊ नये म्हणून सिंह यांनी प्रयत्न केले होते, अशी चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात होती.

अधिक वाचा  अजितदादांनी ताफा थांबवला गाडीतून उतरले, मदतीलाही धावले, नेमकं काय झालं?

भाजप सरकार कोसळलं; वाघेला मुख्यमंत्री

वाघेला यांनी 45 पेक्षा अधिक आमदारांसह बंड केल्याने भाजप सरकार कोसळलं. काँग्रेसच्या पाठिंब्याने वाघेला मुख्यमंत्री झाले. जवळपास 2 वर्ष ते मुख्यमंत्री राहिले.

25 वर्षानंतर मोदींनी काढला वचपा?

25 वर्षांपूर्वी भाजपने गुजरातमध्ये मिळवलेल्या यशात मोदींचा महत्त्वाचा वाटा होता. मात्र वाघेला यांच्यामुळे भाजपला पाच वर्षे सरकार चालवता आलं नाही. काँग्रेसमुळे आणि विशेषतः दिग्विजय सिंह यांच्यामुळे त्यावेळी गुजरातमधलं भाजप सरकार कोसळलं होतं. आता दिग्विजय सिंह यांच्याच मध्य प्रदेशमधलं काँग्रेस सरकार कोसळण्याच्या स्थितीत आहे. विशेष म्हणजे काठवरचं बहुमत असताना सत्ता स्थापन करण्यात दिग्विजय यांचा मोठा वाटा होता.

अधिक वाचा  आम्हाला जास्त जागा द्या, नाही तर… शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान काय?; महायुतीत इशारेबाजी सुरूच

दिग्विजय यांच्या राजकारणामुळेच सिंधिया पक्षापासून दूर गेल्याचं बोललं जातं. आज सकाळी सिंधिया यांनी मोदींच्या भेटीनंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार मोठ्या अडचणीत सापडलं आहे. त्यामुळे मोदींनी 25 वर्षांपूर्वीच्या घटनेचा वचपा काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.