भोपाळ,10 मार्च: काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी आपला प्लॅन बदलला आहे. ज्योतिरादित्य आज (मंगळवार) सायंकाळी भाजपमध्ये (BJP)अधिकृत प्रवेश करणार होते. परंतु ज्योतिरादित्य येत्या 12 मार्चला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ज्योतिरादित्य 12 मार्च रोजी सकाळी 9 वाजता भाजपच्या गोटात सामील होणार आहे. या वेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थीत राहाणार आहेत. शिवराज सिंह सध्या भोपाळमध्ये आहेत. सूत्रांनुसार शिवराज सिंह आज रात्री दिल्लीत पोहोचू शकतात.
दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थक 22 आमदारांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. भाजप नेते गोपाल भार्गव, नरोत्तम मिश्रा यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष एनपी प्रजापती यांची भेट घेतली. काँग्रेसच्या 19 काँग्रेस आमदारांचे राजीनामे त्यांच्याकडे सुपूर्द केले.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरात रंगोत्सवाची धूम असताना दिल्लीसह मध्य प्रदेशात राजकीय वातावरण तापलं आहे.
दुसरीकडे, मध्य प्रदेशातील काँग्रेसचं सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी खटपट सुरु केली आहे. मध्य प्रदेशात बंडखोरी करणारे 6 मंत्री हटवण्याबाबत मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपालांना पत्र पाठवले आहे. इमरती देवी, तुलसी सिलावट, गोविंद सिंह राजपूत, महेंद्र सिंह सिसोदिया, प्रद्युमन सिंह तोमर आणि डॉ. प्रभुराम चौधरी या मंत्र्यांचा या पत्रात उल्लेख आहे.
दुसरीकडे, समाजवादी आणि बहुजन समाज पक्षाच्या एक-एक आमदाराने शिवराज सिंह चौहान यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. दोन्ही आमदार भाजममध्ये प्रवेश करणार आहेत. मध्य प्रदेशातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  सर्वात मोठी बातमी ! वाल्मिक कराडला अखेर मकोका; खूनाचा गुन्हा दाखल होणार?