पुणे: पुण्यात आणखी दोघांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून पुण्यातील करोना रुग्णाची संख्या पाचवर पोहोचली आहे. यात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. तर या तिघांनी ज्या ओला टॅक्सीतून प्रवास केला होता, त्या टॅक्सीचालकालाही करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. हा ओला चालक मुंबईचा राहणारा असल्याची शक्यता वर्तविली जात असून हा चालक मुंबई आणि पुण्यात ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आला होता, त्या सर्वांची तपासणी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पुण्यात दुबईतून आलेल्या एका दाम्पत्याला करोनाची लागण झाल्याचं कालच उघड झालं होतं. त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या यवतमाळमधील एका व्यक्तिलाही करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्यात आली होती. या दाम्पत्याची मुलगी आणि त्यांनी मुंबई ते पुणे ज्या ओला कंपनीच्या टॅक्सीतून प्रवास केला होता, त्या टॅक्सी चालकाचीही तपासणी करण्यात आली होती. आज या दोघांचे चाचणी अहवाल आले असता त्यात त्यांना करोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे या दोघांना तातडीने नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनीही आणखी दोन जणांना करोनाची लागण झाल्याची पृष्टी केली आहे.
करोना मुंबईतही?
दरम्यान, हा टॅक्सीचालक मुंबईचा राहणारा असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या दाम्पत्याला मुंबईहून पुण्यात सोडल्यानंतर हा टॅक्सीचालक पुणे आणि मुंबईत ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आला त्यांचीही तपासणी होणार आहे. या टॅक्सीचालकाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचीही तपासणी करण्यात येणार असून मुंबईतही करोनाचे आणखी रुग्ण आहेत का? याची तपासणी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, हे दाम्पत्य ज्या ४० लोकांसोबत दुबईला गेले होते, त्यांचीही तपासणी सुरू करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती काढण्यासाठी तसेच अन्य काळजी घेण्यासाठी एकूण पाच पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये महसूल, आरोग्य, पोलिस आणि दोन्ही महानगरपालिकांचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सदर पथकाद्वारे वरील दोन्ही रुग्ण ज्या विभागामध्ये किंवा परिसरामध्ये गेले असतील त्या ठिकाणी कोरोना बाधित अथवा संशयित व्यक्ती आढळून येत असल्यास त्याची खातरजमा करण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.