पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महापालिकेने प्रस्तावित केलेला तळजाई टेकडी-हिंगणे या भुयारी मार्गाचा प्रस्ताव रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भुयारी मार्गाच्या तांत्रिक तपासणीसाठी सल्लागार पुढे येत नसल्यामुळे भुयारी मार्गासाठी आवश्यक असलेल्या बोगद्यासाठीचे सर्वेक्षण महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी करावे, तसेच मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीटेल प्रोजेक्ट रिपोर्ट- डीपीआर) तयार करून द्यावा, असे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. मात्र तांत्रिक कारणांमुळे महामेट्रोकडून हे काम करण्यास असमर्थता दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे हे काम रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या मंजूर विकास आराखडय़ात सहकारनगर आणि हिंगणे, सिंहगड रस्ता हे भाग तळजाई टेकडी येथे बोगदा करून जोडण्याचे नियोजित आहे. बोगद्याच्या या कामासाठी सन २०१८-१९ या वर्षीच्या अंदाजपत्रकात दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. बोगद्याचे तांत्रिक सर्वेक्षण करणे, त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा करणे अशी कामे यात प्रस्तावित होती. बोगद्यासाठीच्या तांत्रिक बाबींच्या तपासणीसाठी तसेच सर्वेक्षणासाठी महापालिकेने जाहिरातही प्रसिद्ध केली होती. मात्र तीन वेळा ही प्रक्रिया करूनही कोणताही सल्लागार पुढे आला नव्हता.
या दरम्यान, स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मेट्रो मार्गिकेअंतर्गत शेतकी महाविद्यालय ते स्वारगेट या पाच किलोमीटर लांबीच्या भूमिगत मेट्रो मार्गिकेचे काम सुरू झाले. त्यामुळे महापालिकेने महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला पत्र पाठवून बोगदा सर्वेक्षणाच्या कामात सहकार्य करावे, अशी मागणी केली होती. मात्र मेट्रो मार्गिकेसाठी ज्या पद्धतीने बोगदा तयार केला जात आहे, त्यासाठी वापरण्यात येत असलेले तंत्रज्ञान आणि तळजाई टेकडीवरील प्रस्तावित भुयारी मार्गाचे तंत्रज्ञान यात मोठा फरक आहे. त्यामुळे महामेट्रोकडून हे काम करण्यास असमर्थता दर्शविण्यात आली आहे. दक्षिण आणि पूर्व दिशेची उपनगरे एकमेकांना जोडण्यासाठी तळजाई टेकडी ते हिंगणे सिंहगड रस्ता हा भुयारी मार्ग उपयुक्त ठरणार होता. सिंहगड रस्त्यावरील धायरी, माणिकबाग, सनसिटी, नांदेड सिटी, वडगांव बुद्रुक या ठिकाणी जाण्यासाठी सध्या पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे सिंहगड रस्त्यावर सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. सहकारनगर, बिबवेवाडी, कोंढवा आणि लष्कर भागासाठी जाण्यासाठी सध्या कात्रज बाह्य़वळण मार्गाचा किंवा स्वारगेट मार्गे सातारा रस्त्याचा वापर वाहनचालकांना करावा लागत आहे.
बालभारती पौड रस्ताही रखडला
बालभारती ते पौड फाटा हा रस्ताही विकास आराखडय़ात मंजूर झाला आहे. हा मार्ग तीस मीटर रुंद आणि दोन किलोमीटर लांब असा आहे. या रस्त्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या रस्त्यामुळे वाहतुकीवर, पर्यावरणावर आणि सामाजिक काय परिणाम होतील, या संदर्भात मूल्यांकन करून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने ही प्रक्रिया पूर्ण केली असून न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या समितीपुढे त्याचे सादीरकरण झाले आहे. मात्र समितीने त्या संदर्भात काही आक्षेप उपस्थित केले आहेत. त्यामुळे हा रस्ताही रखडणार आहे.
अंदाजपत्रकात तरतूद नाही
तळजाई टेकडी फोडून हा मार्ग करण्यास शहरातील काही पर्यावरणप्रेमींचाही विरोध आहे. त्यामुळे प्रारंभी या रस्त्याचे काम पुढे सरकू शकले नव्हते. गेली दोन वर्षे या मार्गाबाबत तिढा निर्माण झाला होता. त्यामुळे आगामी अंदाजपत्रकातही या मार्गासाठी तरतूद झालेली नाही.
तळजाई टेकडी-हिंगणे या भुयारी मार्गासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. बोगद्याचे तांत्रिक सर्वेक्षण करण्यासाठी बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.
– व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभाग प्रमुख