काबूल: अफगाणिस्तानमधील राजकीय तेढ कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीपदी अशरफ गनी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. मात्र, त्याच वेळी त्यांचे विरोधक अब्दुला यांनीदेखील राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. त्यामुळे अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर अफगाणिस्तानमधील राजकीय तेढ कायम असल्याचे चित्र आहे.
अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीपदी निवडून आलेले अशरफ गनी यांची निवड वैध नसल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांनी केला. आपणच निवडणूक जिंकलो असल्याचा दावा अब्दुला यांनी केला होता. त्यामुळे राष्ट्रपतीपदी आपलाच शपथविधी झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती. अमेरिकेचे राजदूत जालमय खालिजाद यांनी गनी आणि अब्दुला यांच्या रविवारी बैठक आयोजित केली होती. मात्र, त्यात काही निष्पन्न झाले नाही. अखेर काबूल येथील राष्ट्रपती भवनात अशरफ गनी यांचा शपथविधी पार पडला. यावेळी अमेरिकेचे राजदूत जालमे खालिजाद, अमेरिका-नाटो सैन्याचे कमांडर जनरल स्कॉट आदींसह इतर आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित होते.
अशरफ गनी यांच्या शपथविधीनंतर सभा झाली. त्यावेळी स्फोट झाल्याने गोंधळ उडाला. हे स्फोट सुरू असतानादेखील गनी यांनी आपले भाषण सुरूच ठेवले होते.
दरम्यान, राजकीय अस्थिरतेच्या वातावरणाचा परिणाम तालिबानसोबत सुरू होणाऱ्या शांतता चर्चेवर होण्याची शक्यता आहे. तालिबान आणि अफगाणिस्तान सरकार यांच्यात चर्चा सुरू होणार होती. आता मात्र, दोन्ही राजकीय विरोधक आमनेसामने असल्यामुळे अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार