अमरावती : सोमवारी दहावीची इंग्रजी विषयाची परीक्षा सुरू असताना अमरावती विभागात गरप्रकारांची (कॉपी) तब्बल १७ प्रकरणे उघड झाली. गेल्या ३ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आणि आतापर्यंत ४२ परीक्षार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले आहे. दुसरीकडे, ४ मार्चला मराठी विषयाची परीक्षा सुरू असताना वलगाव येथील परीक्षा केंद्राबाहेर एका युवकाला ताब्यात घेण्यात आले, तेव्हा त्याच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरेही आढळून आल्याने याप्रकरणी वलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या भेटीदरम्यान उघड झाला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. बारावीची परीक्षा आटोपत आली असून दहावीचा आज महत्त्वाचा मानला जाणारा इंग्रजीचा पेपर होता. इंग्रजी विषयाच्या या परीक्षेत संपूर्ण विभागातून कॉपीची १७ प्रकरणे निदर्शनास आली. बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत गैरप्रकारांची ५५ प्रकरणे उघड झाली आहेत.
गेल्या ४ मार्चला दहावीचा मराठीचा पेपर होता. वलगाव येथील एस.एल. हायस्कूल या परीक्षा केंद्रावर मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी भेट दिली. त्यावेळी एक युवक संशयास्पद स्थितीत परीक्षा केंद्राबाहेर आढळून आला. त्याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला, तेव्हा मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरेही दिसून आली. या प्रकरणी वलगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
विभागीय शिक्षण मंडळाने गैरप्रकारांवर देखरेख ठेवण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. भरारी पथकांनी कोणत्या केंद्रावर पाहणीसाठी जायचे आहे, याचे नियोजन विभागीय मंडळ स्तरावरूनच केले जाते. नियोजनाची माहिती पेपरच्या दिवशी सकाळी संबंधित भरारी पथकांना देण्यात येते. त्यात गोपनीयता पाळली जात असल्याचे गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत होणार असल्याचे शिक्षण मंडळातील सूत्रांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून विशेष महिला भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात येते. मंडळ सदस्य आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी व परीक्षा केंद्रांच्या परिसरातील व्हिडीओ चित्रिकरण इत्यादी उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी गैरप्रकार कमी झालेले नाहीत.