नागपूर : महाराष्ट्रात ७ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे. त्यात महाविकास आघाडीच्या ४ जागा निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी १, काँग्रेस १, शिवसेना १ असे जागांचे वाटप होणार आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीची अतिरिक्त एक जागा कोण लढवणार हा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससमोरचा प्रमुख प्रश्न आहे. राष्ट्रवादीने यावर दावा केला असला तरी राज्यसभेचा चौथा उमेदवार महाविकास आघाडी ठरवेल, असा सूचक इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीला दिला आहे.
राज्यसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सध्या अनेकांच्या दिल्लीवाऱ्या सुरू झाल्या आहेत. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. राष्ट्रवादी १, काँग्रेस १, शिवसेना १ असा प्रत्येक पक्षाचा एक उमेदवार विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादीकडे १७, काँग्रेसकडे ७ तर शिवसेनेकडे १९ मते अतिरिक्त ठरत आहेत.
चौथी जागा महाविकास आघाडीत नेमके कोण लढवणार याबाबत काही ठरत नाही. कारण एकीकडे राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणत आहेत की चौथा उमेदवार एकत्रितपणे ठरेल. मात्र फौजिया खान यांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीकडून काही अधिकृत संदेश आलेला नाही.
चौथा उमेदवार तिघांच्या एकत्रित मदतीवरच निवडून येणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला तूर्तास एक जागा मिळणार हे निश्चित आहे. त्यासाठी इच्छुक अनेकजण आहेत. मात्र ८ जणांची नावे सोनिया गांधीकडे देण्यात आली आहेत. याआधी काँग्रेसने राजीव शुक्ला, पी. चिदंबरम यासारख्या अमराठी लोकांना राज्यसभेवर पाठवले होते. त्यामुळे यावेळी स्थानिक उमेदवार असावा हा देखील राज्य कार्यकारिणीचा आग्रह आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून कुणाचे नाव पुढे येते आणि महाविकास आघाडीतल्या चौथ्या जागेचा तिढा नेमका कसा सुटतो हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

अधिक वाचा  शरद पवारांचा मोठा धमाका सुरूचं! पुण्यातही दादांचा ‘मोहरा’ शहराध्यक्ष डझनभर नगरसेवकांसह पुन्हा वापसी करणार?