मुंबई : होळी-रंगपंचमीच्या उत्साहात महिलांची छेडछाड किंवा महिलांविरोधी गुन्हे घडू नयेत यासाठी विशेष उपाययोजना केली आहे. तसेच इच्छा नसल्यास एखाद्यावर रंग उडवल्यास गुन्हा नोंदवण्याच्या सूचनाही सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत. आज, सोमवार आणि मंगळवारी होणाऱ्या होळी आणि रंगपंचमी उत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना कायदा व सुव्यवस्था; विशेषत: दारूच्या नशेत हुल्लडबाजी, धार्मिक तेढ, महिलांविरोधी गुन्हे, वाहतुकीच्या निमयांचे उल्लंघन आणि त्यातून होणारे अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तालयाने दिले आहेत.
पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार, होळी, रंगपंचमीला गालबोट लागू नये यासाठी मुंबईतील सर्व पोलीस मनुष्यबळ रस्त्यांवर असेल. सोमवारी संध्याकाळपासून गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर बंदोबस्त तैनात असेल. साध्या वेशातील पथकांद्वारे गुन्हेगारी प्रवृत्तींवर लक्ष ठेवले जाईल. गस्त वाढवली जाईल.
रविवार ते मंगळवार या काळात अनोळखी व्यक्तींवर, इच्छा नसताना एखाद्यावर रंग उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अशा घटनांमुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
शहरात या सणांमध्ये महिलांना विशेष लक्ष्य केले जाते. त्यामुळे महिलांविरोधी गुन्हे रोखण्यासाठी ही बंदी असल्याचे पोलीस दलातर्फे सांगण्यात आले. असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांनी बंदी आदेशांबाबत आपापल्या हद्दीत सर्वत्र जनजागृती करावी, अशा सूचना आयुक्तालयाने दिल्या आहेत. तसेच अशा तक्रारी आल्यास संबंधितांवर तात्काळ गुन्हा नोंदवून कारवाई करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
इच्छेविरुद्ध रंग उडवल्यास गुन्हा
सर्व पोलीस मनुष्यबळ रस्त्यांवर तैनात
साध्या वेशातील पथकांद्वारे गुन्हेगारांवर लक्ष
छेडछाड रोखण्यासाठी पथके

अधिक वाचा  पुणे पुन्हा ‘हिट ॲण्ड रन’ मुळे हादरले; मार्शल ड्युटीवरील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना उडवले एकाचा मृत्यू एक जखमी