पिरंगुट -चाले (ता. मुळशी) येथे लग्नात फटाक्‍यांची आतषबाजी करताना लागलेल्या आगीत दोन चारचाकी आणि पाच दुचाकी अशा एकूण सात वाहने जळून खाक झाल्या. स्थानिक नागरिक व वऱ्हाडी मंडळींनी आग नियंत्रणात आणल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, चाले येथे असलेल्या सुभद्रा लॉन्स मंगल कार्यालयात वहाळे व चंद्रस या परिवारातील मुला-मुलींचा विवाहसोहळा होता. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विवाह संपन्न झाल्यावर याठिकाणी फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. या फटक्‍यांची ठिणगी जवळ असलेल्या गवतावर जाऊन पडली आणि गवताने पेट घेतला. त्यामुळे या चठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांना आग लागली.
बघता बघता आग भडकली आणि यामध्ये दोन चारचाकी व पाच दुचाकी गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आग आटोक्‍यात येईपर्यंत ही सातही वाहने जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच पौडचे सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे, पोलीस हवालदार मंगेश लांडगे, पोलीस शिपाई नामदास घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, मुळशी तालुक्‍यात भुगाव, भुकुम, माण, हिंजवडी, घोटावडे, शेरे आदी ठिकाणी मंगल कार्यालये आहेत.याठिकाणी लग्न झाल्यावर मोठ्या प्रमाणावर फटाक्‍यांची आतषबाजी केली जाते. बहुतांश वेळा हे फटाके वाहने पार्किंग केलेल्या ठिकाणी वाजाविले जातात. परिणामी वाहनांना आग लागून मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे फटाके वाजविताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. तसेच मंगल कार्यालयात एका विशिष्ट ठिकाणी सुरक्षितता ठेवून फटाके वाजविले पाहिजे. यामुळे अशा घटनांना आळा बसू शकेल.

अधिक वाचा  ‘गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात’, संजय राऊत यांचा महायुतीवर निशाणा