पुणे: सिम्बायोसिस इंटरनॅशनल अभिमत विद्यापाठीला महिला मेडिकल कॉलेज स्थापन करण्यास मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिली. त्या मान्यतेमुळे आता येत्या २०२०-२१ शैक्षणिक वर्षात या मेडिकल कॉलेजमध्ये दीडशे महिलांना ‘एमबीबीएस’च्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकणार आहे. हे मेडिकल कॉलेज लवळे येथील कॅम्पसमध्ये असून, ते देशातील पहिले निवासी महिलांचे मेडिकल कॉलेज असल्याचा दावा संस्थेने केला आहे.
सिम्बायोसिसच्या मेडिकल कॉलेजमध्ये सर्वोत्कृष्ट अध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेतर्फे आनंदी गोपाळ यांच्या नावे पाच शिष्यवृत्ती सुरू केल्या आहेत. या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रमाचे संपूर्ण शुल्क माफ केलेले असेल. या पाच जणांना विनामूल्य देणारे देशातील हे पहिले वैद्यकीय महाविद्यालय असल्याचा दावाही संस्थेने केला आहे.
वैद्यकीय महाविद्यालायत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक मुलीला पहिल्या दिवशी शपथ देण्यात येणार असून, त्याद्वारे समाजाला आरोग्यसेवा देण्यास बांधिल आहोत, असे वचन घेतले जाणार आहे. ‘सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर’ हे ९०० खाटांचे रुग्णालय मेडिकल कॉलेजशी निगडित असणार आहे. हे रुग्णालय २० ते २५ किलोमीटर परिसरातील लोकसंख्येच्या वैद्यकीय सेवेचे गरज निश्चित भागवेल, अशी अपेक्षा सिम्बायोसिस इंटरनॅशनल अभिमत विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर यांनी व्यक्त केली.
सिम्बायोयिसच्या रुग्णालयाच्या स्थापनेला अद्याप एक वर्ष झालेले नाही. तरीही रुग्णालयात दररोज सुमारे ८०० ते १ हजार रुग्णांना तपासले जाते. दररोज सुमारे २५० ते २७० रुग्ण उपचारांसाठी दाखल होतात. दररोज सुमारे १० ते १२ शस्त्रक्रिया होतात. क्लिनिकल, नॉन क्लिनिकल कौशल्ये विकसित करण्यासाठी सिम्बायोसिस टिचिंग लर्निंग रिसोर्स सेंटर, तसेच ‘सिम्बायोसिस स्कूल ऑफ ओपन डिस्टन्स लर्निंग’मार्फत ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षण कार्यक्रमदेखील उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले.