औंध – औंध परिसरात अतिक्रमण कारवाईमध्ये उचलण्यात येणाऱ्या हातगाड्या तसेच इतर साहित्य बालेवाडी येथील दसरा चौकातील गोदामात ठेवले जाते; परंतु क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाकडून अशा साहित्याची कोणत्याही प्रकारे काळजी घेतली जात नाही. पथारी व्यावसायिकांच्या साहित्याची याठिकाणी मोडतोड तसेच चोरी होत आहे. दंड भरून देखील जप्त केलेले त्यांचे साहित्य मिळत नाही. हातगाड्या तुटलेल्या अवस्थेत असतात, तर कधी जप्त केलेले साहित्य चोरीला गेल्याचे सांगण्यात येते. यातून पथारी व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असून शासकीय यंत्रणेने चोरांसाठी हे गोदाम उघडे ठेवले आहे का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
बालेवाडी येथील दसरा चौकात अतिक्रमण विभागाकडून उचलून आणण्यात आलेल्या हातगाड्या, टपऱ्या व इतर साहित्य ठेवण्यात आले आहे. याठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने येथील साहित्य चोरीला जात आहे. काही दिवसांपूर्वी औंध येथील पथारी व्यावसायिक दंड भरून आपले साहित्य गोदामातून घेण्यासाठी गेले असता तेथील सुरक्षा रक्षक मद्यपान करून झोपलेल्या अवस्थेत होता, त्याला उठविण्याचा प्रयत्न बराच वेळ केल्यानंतरही तो उठला नाही. याबाबत तक्रार करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांकडे गेले असता ते ही उपलब्ध नव्हते.
या ठिकाणी संपूर्ण साहित्य अस्ताव्यस्त पडले असून कोणते साहित्य कोणाचे आहे, याची कोणालाच माहिती नसते. पथारी व्यावसायिक दंड भरून आपले साहित्य घेण्यासाठी जातात त्यावेळी साहित्य सापडत नाही आणि सापडलेच तर मोडतोड झालेल्या अवस्थेत सापडते.
दरम्यान, पथारी व्यावसायिक ज्ञानेश्‍वर जुनवणे हे आपली जप्त केलेली हातगाडी आणण्यासाठी गोदामात गेले असता त्यांच्या गाडीमध्ये असलेले साहित्य चोरीला गेले असल्याचे सांगण्यात आले, त्यांच्या गाडीची मोडतोडही करण्यात आली होती, याबाबत जुनवणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. गोदामातील साहित्याची पाहणी करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. चोरी झाल्या संदर्भात पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. दोषी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कारवाईतील साहित्य चोरीला जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
– माधव जगताप, अतिक्रमण नियंत्रण विभाग

अधिक वाचा  आधी ‘मातोश्री’ मग ‘वर्षा’… मध्यरात्रीनंतर अंबानी ठाकरे-शिंदेंना घरी जाऊन भेटले; चर्चांना उधाण!