बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. अत्यंत देखणी, हुशार आणि त्यात कपूर कुटुंबातून आलेली अभिनेत्री असल्याने तिच्या नावाची चांगलीच चर्चा असायची. करिश्माचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. पण तिच्या करिअरमधील सर्वात यशस्वी चित्रपटाबद्दल जेव्हा कधी चर्चा होती तेव्हा एका चित्रपटाचं नाव हमखास घेतलं जातं तो म्हणजे ‘राजा हिंदुस्तानी’. १९९६ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. चित्रपट प्रदर्शित होऊन २४ वर्ष झाली असून त्यानंतर करिश्माने चित्रपटाशी संबंधित एक खुलासा केला आहे.
१९९६ मध्ये आलेल्या या चित्रपटात करिश्मासोबत आमीर खान मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. चित्रपटातील गाणी तर आजही लोक गुणगुणत असतात. त्यातील ‘परदेसी जाना नाही’ हे गाणं आजही अनेक ठिकाणी वाजताना ऐकायला मिळतं. पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा एका सीनची जबरदस्त चर्चा होती. हा सीन होता आमीर खान आणि करिश्माचा किसिंग सीन. या सीनसंबंधी करिश्माने खुलासा केला असून त्यावेळी आपण प्रचंड घाबरलो होतो असं सांगितलं आहे. आपण अक्षरश: थरथरत होतो असं ती सांगते.
एका मुलाखतीत बोलताना करिश्माने सांगितलं आहे की, “राजा हिंदुस्तानी चित्रपटाबद्दल अनेक आठवणी आहेत. पण जेव्हा हा चित्रपट आला तेव्हा लोकांमध्ये किसिंग सीनसंबंधी चांगलीच चर्चा होती. पण त्यांना माहिती नाही की, हा सीन शूट करण्यासाठी आम्हाला तीन दिवस लागले होते. फेब्रुवारी महिन्यात उटीमध्ये खूप थंडी होती. आणि हा सीन संध्याकाळी सहा वाजता शूट केला जात होता. त्यामुळे मी अक्षरश: थरथरत होते. ही सीन कधी संपणार असा विचार करत होते”. सध्या करिश्मा कपूर बॉलिवूडपासून दूर आहे. पण आजही तिचे अनेक चाहते आहेत. चित्रपटांपासून दूर असलेली करिश्मा आता वेब सीरिजच्या माध्यमातून पदार्पण करण्यास सज्ज आहे. करिश्मा लवकरच जी ५ वर येणाऱ्या मेंटलहूड वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.