मुंबईः येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर ईडीने शुक्रवारी रात्री छापा टाकला. काही वित्त तंत्रज्ञान कंपन्यांना दिलेली कर्ज थकीत झाली व त्याचवेळी यासाठी परदेशातील पैसा कपूर यांनी वापरल्याचा संशय आहे. मनी लाँड्रींग कायद्यांतर्गत ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. राणा कपूर यांच्यावर वारेमाप कर्जवाटप केल्याचा आरोप आहे.
राणा कपूर यांच्या वरळीतील घरावर ईडीने हा छापा टाकला. छाप्यात ईडीकडून कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. एका रिपोर्टनुसार राणा कपूर विरोधात लुकआउट नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे राणा कपूर हे चौकशी पूर्ण होईपर्यंत आता देश सोडून जाऊ शकत नाही. दिवाळखोरीत निघालेल्या येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले आहेत. यानुसार खातेदारांना महिन्याभरात फक्त ५० हजार रुपये काढता येणार आहेत. तसंच येस बँकेचे संचालक मंडळही बराखास्त केले आहेत.
येस बँक खातेदारांचे पैसे सुरक्षित, सरकारची ग्वाही
राणा कपूर यांनी नोटबंदीनंतर मोदी सरकारची तोंडभर स्तुती केली होती. यामुळे राणा कपूर सोशल मिडीयावर चांगलेच ट्रोल झाले आहेत. दरम्यान, आपण १३ महिन्यांपूर्वी बँकेतून बाहेर पडलो असून या दरम्यान काय घडले याची आपल्याला कल्पना नाही, असे सांगून राणा कपूर यांनी हात झटकले आहेत. बँकेला भांडवल उभे करण्यात अपयश आल्याने, बँकेच्या प्रशासनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. दरम्यान, आरबीआयच्या कारवाईमुळे कपूर यांना गेल्या वर्षी येस बँकेतून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर बँकेची एकूण व्यवसायाची गुणवत्ता घसरली. कपूर यांच्या काळात अनेक कंपन्यांना असुरक्षित कर्ज देण्यात आली होती.

अधिक वाचा  पुण्यातील शाळेतील कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सँडविच दिले, 350 विद्यार्थ्यांना विषबाधा, पालकांनी केली कारवाईची मागणी