नवी दिल्ली : येस बँकेवर (Yes Bank Crisis) सरकारने आर्थिक निर्बंध लादल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. 5 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीसाठी 50 हजार रुपयांची विड्रॉल लिमिट निर्धारित केल्याने ठेवीदारांमध्ये भीती पसरली आहे. वाढत्या कर्जाच्या बोज्यामुळे येस बँक अडचणीत आली आहे.
दुसरीकडे येस बँकेला रुळावर आणण्यासाठी सरकारने प्लान तयार केला आहे. देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय बँक भारतीय स्टेट बँक (State Bank of India) येस बँकेत मोठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी दिली. ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असल्याचंही सीतारमँ येस बँकेचे 49 टक्के शेअर्स एसबीआय खरेदी करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) अधिकृत वेबसाइटवर येस बँकेच्या रिस्ट्रक्चरिंगबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारणम यांनी सांगितलं की, सन 2017 पासूनच येस बँकेच्या आर्थिक व्यवहारावर RBIचं लक्ष आहे. तपास संस्था या प्रकरणी सविस्तर चौकशी करत आहे. मार्च 2019 मध्ये येस बँकेवर RBIनं एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. सप्टेंबर 2019 पासून सिक्युरिटी अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)या प्रकरणी चौकशी करत आहे. गेल्या वर्षी मे आणि जून महिन्यातही येस बँकेला दंड ठोठावण्यात आला होता. सप्टेंबर 2019 मध्ये येस बँकेचे माजी प्रवर्तकांची संपूर्ण भागिदारी विकली होती. दरम्यान, बँकेची तरलता राखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली होती. मात्र, याचा काही लाभ होऊ शकला नाही. त्यामुळे नोव्हेंबर 2019 मध्ये हे लक्षात आलं होतं की येस बँकेला कुठूनही पैसा मिळू शकणार नाही, असेही सीतारामण यांनी यावेळी सांगितलं. सन 2014 च्या आधीपासूनच येस बँकेचा कारभार दबावाखाली होता. यामध्ये एस्सेल ग्रुप, डीएचएफएल, आयएलअँण्डएफएस आणि व्होडाफोन सारख्या कॉर्पोरेट कंपन्यांचा समावेश आहे. आम्ही ठेवीदारांच्या पैशांवर कोणताही परिणाम होणार नाही. तो सुरक्षित असल्याची ग्वाही निर्मला सीतारणम यांनी दिली आहे.
एसबीआयने खरेदी करणार 49 टक्के शेअर्स
निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, येस बँकेच्या आर्थिक व्यवहाराची RBI पडताळणी करत आहे. काही लोकांना या प्रकरणात व्यक्तीगतरित्या हस्तक्षेप केल्याचेही समोर आले आहे. याबाबत लवकरच माहिती देण्यात येईल. दरम्यान, एसबीआयने येस बँकेचे 49 टक्के शेअर्स खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे सीतारमण यांनी यावेळी सांगितलं.
येस बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून SBI चे माजी मुख्य वित्त अधिकारी प्रशांत कुमार यांची येस बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खातेदारांनी घाबरू नये, असं आवाहनही रिझर्व्ह बँकेने केलं आहे. दरम्यान, गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेने घोळामुळे पीएमसी बँकेवरही निर्बंध घालण्यात आले होते. यामुळे खातेदारांचे मोठे हाल झाले आहे.