कोल्हापूर: करोनाने भारतातही प्रवेश केल्याने महाराष्ट्रातही खबरदारी घेण्यात येत आहे. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील चारही प्रवेशद्वारात भाविकांच्या हातावर जंतूनाशक सॅनिटायझर देऊनच मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. करोना विषाणू संसर्गजन्य असल्याने त्याचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. तसेच भाविकांनी देवीच्या दर्शनाला येताना तोंडाला मास्क, स्कार्फ किंवा रुमाल बांधून येण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
करोनाचा प्रभाव दिवसेदिवस वाढत असून हा रोग संसर्गजन्य असल्याने त्याचा प्रसार रोखण्यासाठी पावले उचलली जात आहेत. अंबाबाई मंदिरात रोज देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. त्यादृष्टीने देवस्थान समितीने उपाययोजना सुरू केली आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी महाद्वार, घाटी, पूर्व आणि दक्षिण असे चार दरवाजे आहेत. या दरवाजातून प्रवेश करणाऱ्या भाविकांच्या हातावर सॅनिटायझरचे थेंब टाकून त्यांचे हात निर्जंतुक करण्यात येणार आहेत. मंदिरात रोज १५ ते १७ हजार भाविक दर्शनासाठी येतात. त्यांना पुरेल इतके सॅनिटायझर उपलब्ध झाल्यानंतर पुढील दोन दिवसांत ही उपययोजना सुरू करण्यात येणार आहे. आजारपण विसरून अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यांनी तोंडाला मास्क, स्कार्फ, रुमाल बांधून यावे, असे आवाहनही समितीकडून करण्यात आले आहे.
मंदिरात स्वच्छता राखण्यात येत असून दर आठ दिवसात मंदिरात पेस्ट कंट्रोल करण्यात येते. तीन ते चार तासांनी मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे. चारही प्रवेशद्वारावर करोना आजाराची माहिती आणि प्रतिबंधक उपाययोजनासंबधी डिजिटल फलक लावण्यात येणार आहेत. मंदिराच्या आवाराताील ध्वनीक्षेपकावर दर एका तासाने करोनासंबधी नागरिकांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात याच्या सूचना देऊन जनजागृती केली जात आहे. तसेच माहिती पत्रके छापून वाटण्यात येणार आहेत.
“करोना हा संसर्गजन्य रोग असून देवीच्या दर्शनासाठी रोज १५ ते १७ हजार भाविक येतात. या रोगाबाबत जनजागृती करण्यासाठी मंदिर परिसरात डिजिटल फलक लावण्यात येणार असून माहिती पत्रकेही वाटण्यात येणार आहेत. तसेच चारही दरवाजातून मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या हातात सॅनिटायझरचे थेंब टाकून त्यांच्या हाताचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल.”
-महेश जाधव, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती
मंदिर प्रशासनाने आज डॉक्टरांची बैठक घेतली. याबैठकीला समितीचे अध्यक्ष महेश जाधव, डॉ. संदीप पाटील, स्वप्नील भोसले, डॉ. सचिन शिंदे उपस्थित होते. मंदिरात करोना संबधित कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा झाली. महानगरपालिका प्रशासनाचीही उपाययोजना करण्यासाठी मदत घेण्यात येणार असल्याचं मंदिर समितीने सांगितलं.

अधिक वाचा  सोलापूरच्या निकरीच्या लढाईत फडणवीसांनी पुन्हा दंड थोपटले; तुम्ही समर्थन कोणालाही द्या, तरी मते मोदींनाच!