पिंपरी : सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशभर गदारोळ सुरू असताना राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीबाबतचा वादही सुरू झाला असून, त्यामुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा फटका पिंपरी महापालिकेच्या जनगणना पूर्वतयारीचे काम करणाऱ्या दोन अभियंत्यांना बसला. या कर्मचाऱ्यांच्या जनगणना पूर्वतयारीच्या कामाला आक्षेप घेतला गेल्याने शाब्दिक वाद झाला. दापोडीतील या घटनेची चित्रफीत सध्या समाजमाध्यमात चर्चेचा विषय ठरली आहे.
पिंपरी महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाचे दोन स्थापत्य अभियांत्रिकी सहायक जनगणना पूर्वतयारीचा भाग म्हणून दापोडीत एका गृहरचना संस्थेत गेले होते. त्या ठिकाणी राहणाऱ्या आणि जनगणनेच्या कामाचा पूर्वानुभव असलेल्या एका शिक्षिकेच्या कुटुंबीयांबरोबर या कर्मचाऱ्यांचा वाद झाला.
प्रत्यक्ष जनगणनेचे काम सुरू झालेले नाही, तुम्ही कसे काय आलात, आमच्या घराची माहिती कशी घेत आहात, तुमचे ओळखपत्र दाखवा, नियुक्ती झाल्याचा आदेश दाखवा, असे विविध मुद्दे या शिक्षिकेकडून उपस्थित करण्यात आले. त्यावर संबंधितअभियंत्यांना समाधानकारक उत्तरे देता येत नव्हती. यावरून झालेल्या खडाजंगीनंतर त्या अभियंत्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. त्यावेळसच्या संभाषणाची व त्यातून झालेल्या शाब्दिक वादाची चित्रफीत प्रसारित झाली आहे. यासंदर्भात, प्रसारमाध्यमांकडे कोणतेही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.
जनगणना विभागाचे प्रमुख, सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले, की सध्या जनगणना पूर्वतयारीचे काम सुरू आहे. त्या तयारी अंतर्गत सीमांकन निश्चिती, कुटुंबप्रमुखाचे नाव व सदस्यसंख्या अशाप्रकारची माहिती संकलित केली जात आहे. त्या आधारे अंदाजित संख्या निश्चित करून जनगणनेसाठी आवश्यक मनुष्यबळ व त्यांच्या कामाचे स्वरूप निश्चित केले जाणार आहे. १ मे पासून प्रत्यक्ष जनगणनेचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी गट पाडण्याचे काम सुरू आहे. चित्रफितीतील त्या घटनेविषयी भाष्य करण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली.

अधिक वाचा  माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत ! अर्थमंत्री सीतारामन यांचे विधान चर्चेत