नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या जातीय हिंसाचाराचे देशात पडसाद उमटत असतानाच आता त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिल्ली पेटलेली असताना भारत दोऱ्यावर होते. पण त्यांनी दिल्लीतल्या प्रकरणावर भारताचा अंतर्गत विषय आहे म्हणून बोलायचं टाळलं होतं. पण आता इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह अली खामेनी यांनी एकप्रकार भारताला इशारा दिला आहे.
खामेनी यांनी,’अतिरेकी हिंदूंचा सामना करा’ आणि “मुस्लिमांची हत्याकांड थांबवा’ असं स्पष्टपणे बजावलं आहे. देशाची राजधानी नवी दिल्लीत झालेल्या जातीय हिंसाचारानंतरची जागतिक स्तरावरून आलेली ही पहिलीच प्रतिक्रीया आहे.
इराण सारख्या मुस्लीम शासित देशाकडून आलेली ही प्रतिक्रीया फार महत्वाची मानली जात आहे. सीएएच्या विरोधात आणि समर्थनार्थ सुरू असेलल्या आंदोलनानंतर दिल्लीत उसळलेल्या दंगलीत 44 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.
इराणकडून दिल्ली दंगलीची दखल
इराणचे सर्वेसर्वा अयातुल्लाह अली खामेनी यांनी म्हटलं आहे की,’ भारतातील मुसलमानांच्या हत्याकांडाबद्दल जगभरातील मुस्लिमांची अंतःकरणे शोक करणारी आहेत’. इतकंच नाही तर खामेनी यांनी,’अतिरेकी हिंदूंचा सामना करा’ आणि “मुस्लिमांची हत्याकांड थांबवा’ असं स्पष्टपणे बजावलं आहे. इराणने भारतीय मुस्लिमांवरील संघटित हिंसाचाराच्या लाटेचा निषेध केला आहे,” असे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावद जरीफ यांनी सोमवारी ट्वीट केले होते.
भारताने व्यक्त केली तीव्र नाराजी
दरम्यान इराणच्या प्रतिक्रीयेने भारत अस्वस्थ झाला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने भारतातील इराणच्या राजदूतांना तडकाफडकी बोलावण्यात आले. इतकंच नाही तर इस्लामिक रिपब्लिकचे राजदूतांकडे अधिकृतपणे निषेध नोंदवला. आम्हाला इराणसारख्या देशातून अशा प्रकारच्या टिप्पण्यांची अपेक्षा नाही,” असे मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी नंतर एका निवेदनात म्हटले आहे. नागरिकत्व कायद्यानुसार अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील मुस्लिमांना भारतीय नागरिकत्वाचा मार्ग उपलब्ध आहे. पण हा कायदा मुस्लीम समाजावर अन्याय करणारा असल्याचं या कायद्याच्या टीकाकारंना वाटतं.