गडचिरोली : नक्षलवादी चळवळीत २० वर्षे प्रत्यक्ष जंगलात राहून काम केले. तरीही सीपीआय (माओवादी) दंडकारण्य विशेष विभागीय समितीचा सदस्य प्रभाकर याच्यासारख्या वरिष्ठाने माझ्या नेतृत्वाबद्दल अविश्वास दाखवला. त्याचक्षणी नक्षल चळवळीला अखेरचा लाल सलाम करण्याचा विचार मनात आला, अशी माहिती जहाल नक्षलवादी तथा उत्तर गडचिरोली विभागीय समितीचा सदस्य विलास ऊर्फ दसरू कोल्हा (४४) याने शरणागतीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.
गडचिरोली पोलिसांसमोर २८ फेब्रुवारी रोजी दसरू कोल्हा याने शरणागती पत्करली. एके ४७ बंदुकीसह शरणागती पत्करणारा तो पहिला नक्षलवादी असल्याचा गडचिरोली पोलिसांचा दावा आहे. नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागाची संपूर्ण जबाबदारी कोल्हावर होती. याबाबत कोल्हा म्हणाला, काही दिवसांपूर्वी संपूर्ण चातगाव दलम आणि प्लाटून दलमच्या सात सदस्यांनी एकत्रित शरणागती पत्करली. तेव्हा या दलमचा कमांडर जहाल नक्षलवादी सुखलाल होता. मी उत्तर गडचिरोली विभागाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी या सातही नक्षलींचा शरणागतीचा निर्णय झालेला होता. परंतु वरिष्ठ नक्षली नेत्यांनी या संपूर्ण निर्णयाचे खापर माझ्यावर फोडले. ज्या घटनेशी आपला संबंध नाही, त्या घटनेशी जोडण्यात आल्याने दु:ख झाले. हा अपमान सहन न झाल्याने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. तसेच दंडकारण्य विशेष विभागीय समितीचा सदस्य प्रभाकर या वरिष्ठाने माझ्या नेतृत्वाबद्दल चळवळीतील राकेश नावाच्या माझ्या कनिष्ठ सहकाऱ्याने केलेल्या तक्रारीवर विश्वास ठेवला. यामुळे चळवळीत राहायचे नाही हा विचार मनाशी पक्का केला.
त्याच दरम्यान गडचिरोली पोलीस दलाचे माझ्या नावाने असलेले शरणागतीचे आवाहन करणारे आणि घर, १६ लाख रुपये, दुकान इत्यादी सुविधा देण्याचे आश्वासन देणारे पत्रक आढळले. शरणागतीचा निर्णय होताच नक्षलवाद्यांच्या शिबिरातून पळून चंद्रपूर जिल्हय़ातील वरोरा येथे जाण्यासाठी निघालो. जवळ पैसे नसल्यामुळे रस्त्यात भीक मागितली. तसेच जंगलात १४ दिवस पायी चाललो. त्यानंतर वरोरा गाठले. तत्पूर्वी एके ४७ बंदूक पार्लकोटा नदीच्या पात्रात खडकांमागे लपवून ठेवली. वडिलांना शरणागतीची कल्पना दिली. त्यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना सांगितले. बलकवडेंनी मुलाचे नुकसान होणार नाही याची हमी दिली. त्यानंतर एटापल्ली तालुक्यातील विकासपल्ली गावात पोलिसांनी वडिलांना बोलावले. त्यानंतर पोलिसांनी मला गडचिरोली येथे आणले. त्याआधी एके ४७ बंदूक ताब्यात घेतली. मी पोलिसांना चार ठिकाणी पेरून ठेवलेले भूसुरुंग दाखवले होते. त्यातील दोन भूसुरुंग पोलिसांनी निकामी केल्याचे त्याने सांगितले. ज्या राकेश नावाच्या कनिष्ठ सहकाऱ्यावर वरिष्ठ कॅडरच्या नक्षलींनी विश्वास ठेवला. त्या राकेशचे चळवळीतील एका महिलेशी संबंध होते. त्यातूनच हा सर्व प्रकार झाल्याचीही चर्चा आहे.

अधिक वाचा  हेलिकॉप्टर ढगात शिरताच माझ्या पोटात गोळा आला, दादांनी अनुभव सांगितला; फडणवीस म्हणाले…