पुणे जिल्ह्यात खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांचे बनावट आदेश देऊन बोगस शिक्षकांच्या नेमणुका करण्यामागे शिक्षण अधिकारी आणि संस्थाचालक यांच्या संगनमताने शिक्षक आणि तुकड्यां मान्यतेचे बोगस आदेश देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. बनावट मान्यतेने कार्यरत असूनही हे शिक्षक गेल्या अनेक वर्षापासून पगार घेत असल्याची कबुली शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली. याप्रकरणी संबंधित अधिकारी शिक्षक आणि संस्थाचालकांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये बोगस तुकड्या आणि शिक्षक मान्यता दिल्याप्रकरणी आमदार भिमराव तापकीर यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. बोगस मान्यता असूनही हे शिक्षक शाळांवर कार्यरत असून शासनाचा पगार घेत आहेत. या बोगस मान्यता देण्यामागे शिक्षक संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांचे संगनमत असल्याचे उघडकीस आल्यानंतर देखील शासनाकडून कारवाई केली जात नसल्याबद्दल त्यांनी विचारणा केली होती. या वरील उत्तरात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बोगस शिक्षक मान्यतेचे हे प्रकार नोव्हेंबर 2019 मध्ये निदर्शनास आले. जिल्हा परिषदेने याप्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला असून त्यामध्ये संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक संस्थाचालक आणि शिक्षक यांचा या गुन्ह्यांमध्ये समावेश आहे. बोगस मान्यते वर कार्यरत असलेले शिक्षक प्राप्त स्थितीत शाळांमध्ये कार्यरत आहे आणि ते पगार घेत असल्याची कबुली देखील शिक्षणमंत्र्यांनी दिली .