मुंबई : खडकवासला येथील सिंहगड रस्ता, नांदेडपासून पानशेत आणि वेल्हापर्यंतच्या विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. किरकिटवाडी व खडकवासला येथील गावातील रस्त्याची लांबी ११८.७० किमीची असून हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत काम सुरू आहे. या रस्त्याचे काम ३० टक्के पुर्ण झाले असून, सप्टेंबर २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येईल. ही कामे मुदतीत व गुणवत्तापूर्ण कामे न केल्यास कंत्राटदारावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत दिली.
खडकवासला येथील रस्त्यांच्या कामासंदर्भात आमदार भिमराव तापकीर यांनी संबंधित विभागाचे अधिकारी चुकीच्या माहितीच्या आधारे शासनाची दिशाभूल करीत असल्याने जर कंत्राटदार सांगत असलेल्या वेळेत काम पूर्ण करणार असेल तर त्याच्या पोशाख देऊन गौरव करू असा उच्चार केला, आणि याप्रश्नी शासनाने गांभीर्याने लक्ष घालून दोषींवर कारवाईची मागणी केली.
याचर्चेतील उपप्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक वाहिन्या स्थलांतरीत करून काम करावे लागत असल्याने, गतीने काम करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. वाहतुक सुरक्षेची उपाययोजना करून व वाहतुक नियंत्रित करणे पण आवश्यक असून, कामे गुणवत्ता राखून पुर्ण जलद गतीने करण्यात येणार असल्याची असून यामध्ये गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू अशी माहिती मंत्री भरणे यांनी दिली.