मुंबई : देवेंद्र फडणवीसांचे पुस्तक वाचले तर असे वाटते की त्यांच्यात साहित्यिकाचे गुण आहेत. त्यांनी राजकारण सोडून लेखक बनायला हरकत नाही..देवेंद्रजी आता तुम्ही सगळे करून नामानिराळे कसे राहायचे यावर पुस्तक लिहा.. पुढील पाच-दहा वर्षे असेच पुस्तक लिहीत राहा..असे टोले, चिमटे व फटकाऱ्यांनी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात बुधवारी राजकीय रंगपंचमी रंगली. निमित्त होते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावरील पुस्तकाच्या प्रकाशनाचे!
‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या फडणवीस यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी सर्वपक्षीय नेते व्यासपीठावर होते. रंगपंचमी पुढच्या आठवडय़ात असली तरी विधिमंडळातील नेत्यांनी फडणवीस यांच्या कौतुकाचे निमित्त साधत कोटय़ा करत या कार्यक्रमातच राजकीय रंगपंचमी साजरी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण सोडून लेखक व्हायला हरकत नाही. तेवढेच आम्हाला शांतपणे जगता येईल. राम नाईक आलेले आहेत. त्यांनी देवेंद्रजींच्या या ज्ञानाचा उपयोग दिल्लीत करून घ्यावा. अर्थात तसे झाले तर सर्वात जास्त आनंद हा सुधीर मुनगंटीवार यांना होईल, अशी टोलेबाजी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरुवातीलाच कार्यक्रमात रंगत आणली. तोच धागा पकडत विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी विरोधी बाकांवरच जास्त खुलत असल्याने त्यांनी दीर्घकाळ विरोधी पक्षनेतेपदावर राहावे ही शुभेच्छा अशी कोपरखळी लगावली.
पवार यांनी रचलेल्या पायावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कळस चढवला. अशा विषयावर भाष्य करावे लागेल, पुस्तक प्रकाशन करावे लागेल असा विचार केला नव्हता. पण हा प्रसंग तुमच्यामुळेच आला, असा चिमटा ठाकरे यांनी फडणवीस यांना काढला. केवळ मला कळावे म्हणूनच हे पुस्तक लिहिले, असा विनोदही त्यांनी स्वत:वर केला. आपला कार्यक्रम दुसऱ्याच्या खर्चाने कसा करावा हे तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. अजित पवार यांनी तुम्हाला दिल्लीत जाण्याची शुभेच्छा दिली असली तरी मी मात्र फक्त असेच पुस्तक पुढची पाच-दहा वर्षे लिहीत राहा अशा शुभेच्छा देईन, अशी कोपरखळी मारली.
सामान्यांना अर्थसंकल्प समजावा म्हणून..
अर्थसंकल्प हा अनेकांना क्लिष्ट विषय वाटतो. पण तो सामान्य लोकांनाही समजला पाहिजे या भावनेतून २००५ मध्ये पहिल्यांदा हे पुस्तक लिहिले होते. पण आता योजना खर्च-योजनेतर खर्च असे भाग उरले नाहीत. त्यामुळे नव्या संकल्पनांसह सामान्य माणसाला सोप्या शब्दांत अर्थसंकल्प समजावा या दृष्टीने ते पुन्हा लिहिले आहे. विद्वानांसाठी हे पुस्तक नाही. थोडक्यात माहिती दिली आहे. त्यामुळे पुस्तक वाचायला फारतर ४० मिनिटे लागतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी मनोगत मांडताना स्पष्ट केले.