नागपूर: नागपूरमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सेक्स रॅकेटमध्ये सुशिक्षित तरुणींचा सहभाग असल्याचं उघड झालं आहे. स्वतःचे महागडे हौस पूर्ण करण्या साठी हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये काम करणाऱ्या दोन तरुणींना गुन्हे शाखेने सोडवलं आहे.
इंदोर आणि कोलकाता मधून या तरुणींना नागपुरात शरीरविक्रीच्या व्यवसायासाठी आणण्यात आलं होतं, अशीही माहिती समोर आली आहे. नागपुरातील सीए रोड परिसरातील हॉटेल ओयो टाऊनमध्ये छापेमारी करत या काळ्या बाजाराची पोल खोल गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केली आहे.
एक तरुणी एअर होसेट्सचं प्रशिक्षण घेत होती. तर दुसरी तरुणी ही खाजगी कंपनीमध्ये कार्यरत होती. दोन्ही तरुणी या चांगल्या कुटुंबातील आहेत, अशी माहिती आहे. सेक्स रॅकेट चालविणाऱ्या 26 वर्षीय सुल्तान पसवानी आणि त्याचे साथीदार रजत डोंगरे आणि निलेश नागापूरे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड परिसरात पुन्हा एकदा स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. पोलिसांनी हे सेक्स रॅकेट उद्धवस्त करून त्यामध्ये सामील असलेल्या सहा तरुणींची सुटका करण्यात केली होती.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक शहरांमध्ये सेक्स रॅकेटबाबतच्या घटना उघड झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सेक्स रॅकेटला आळा घालण्याचं मोठं आव्हान पोलीस प्रशासनासमोर निर्माण झालं आहे.