पुणे – विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांची काढलेली लाज, नगरसेवकांनी प्रशासनाच्या कारभाराचे काढलेले वाभाडे, अंदाजपत्रकाच्या चर्चेसाठी बोलण्यावरून नगरसेवक आणि महापौरांमध्ये झालेली हमरी तुमरी आणि त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगलेली शेरोशायरीच्या जुगलबंदीने सभागृहात हास्य कल्लोळ उडाला.
त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांची झालेली शाद्बीक खडाजंगीनंतर महापालिकेचे 2020-21 या आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक बुधवारी सायंकाळी मुख्यसभेत एकमताने मंजूर झाले. तब्बल तीन दिवस या अंदाजपत्रकावर 50 हून अधिक नगरसेवकांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यात सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी अंदाजपत्रकावर स्तुती सुमने उधळली तर, विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनी तोंडसुख घेत टीकाही केली.
शेरोशायरीने काढले… एकमेकांना चिमटे
अंदाजपत्रकाचा शेवटचा चर्चेचा दिवस शेरो शायरीने गाजला. सत्ताधारी भाजपकडून बोलताना ज्येष्ठ नगरसेवक गोपाळ चिंतल यांनी शिवसेना महाविकास आघाडीत आमची साथ सोडून गेल्याचे वारंवार बोलून दाखविले. त्याला प्रत्युत्तर देताना, शिवसेनेच्या गटनेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले… दोस्ते से प्यार किया, दुश्मनोसे बदला लिया.. जो भी किया शान से..’ त्यानंतर कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनीही चिंतल यांना शायरीमधूनच सुनवाले.. ‘मुझे छोडकर वो खुश है, तो शिकायत कैसी.. अगर दुख होता है तो फिर युती कैसी’ असे सुनावले. त्यावेळी सभागृहात चांगलाच हशा पिकला.
वादांनी गाजले अंदाजपत्रक
माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांनी विरोधकांना लाज लज्जा नसल्याचे वक्तव्य केल्यानंतर गोंधळ झाला. त्यावर भाजप सदस्यांनी आपेक्ष घेतला, तर भाजपचे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनीही जगताप यांना झारीचे शुक्राचार्य अशी उपमा देत टीका केली. त्यानंतर सभागृहात बोलण्यासाठी आणि चर्चेसाठीच्या वेळेवरून नगरसेवक अविनाश बागवे यांचा थेट महापौरांसोबत वाद झाला. तर, कॉंग्रेस गटनेते शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून खडाजंगी झाली. मात्र, महापौरांनी सूचना दिल्यावर घाटे यांनी विषय बदलल्याने वाद थांबला.