भाईंदर : मीरा रोड येथील घोडबंदर भागात माजी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या ‘अपना घर’ गृहसंकुलामधील वाढीव बांधकाम हे अनधिकृत असल्याचा अभिप्राय नगर रचना विभागातून पालिकेला सोपवण्यात आला आहे. या अहवालामुळे लवकरच या बांधकामावर कारवाई होणार आहे.
मीरा रोड भागात घोडबंदर भागात सुरू असलेला ‘अपना घर’ हा गृहप्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीवर बेकायदा मातीभराव केल्याप्रकरणी महसूल विभागाने सुमारे ७९ कोटींचे शुल्क भरण्याची नोटीस २०१८ मध्ये संस्थेला जारी केली होती.
या गृहप्रकल्पाला रस्ता नसतानाही त्याला दिलेली परवानगी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यावर एमएमआरडीएचे तत्कालीन अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुमारे १.८ किमीच्या काँक्रीट रस्त्यासाठी तब्बल ६५ कोटींचा निधी मंजूर केला. यानंतर गृहप्रकल्पाचे बांधकाम होऊन त्यातील भूखंड ‘अ’ आणि ‘ब’ वर बांधण्यात आलेल्या इमारतींची नगररचना विभागाने तपासणी केली. त्यात भूखंड ‘अ’वरील इमारतीला एकूण १६ हजार ४३४ चौरस मीटरची बांधकाम परवानगी असताना त्यात ५ हजार ७८९ चौरस मीटरचे विनापरवानगी वाढीव बांधकाम केल्याचे दिसून आले. तसेच भूखंड ‘ब’ वरील इमारतीला ९ हजार ९४७ चौरस मीटरची बांधकाम परवानगी असताना त्यात ५ हजार ९४२ चौरस मीटरचे विनापरवानगी वाढीव बांधकाम केल्याचे उघडकीस आले. या भागातील वाढीव बांधकामावर कारवाई झाल्यास मेहता यांना हा दुसरा मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा शहरात सर्वत्र सुरू झाली आहे.

अधिक वाचा  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: आले तरी संविधान…; विरोधकांच्या टीकेला पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर