पुणे – महापालिकेकडून शहरात अतिक्रमण कारवाई केल्यानंतर कारवाईत जप्त केलेला माल परस्पर पैसे घेऊन सोडून देणे तसेच मालाची विक्री केली जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. ही कारवाई प्रभावी होत नसल्याने यावर आता सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार आहे.
अतिक्रमण कारवाईचा जप्त केलेला माल वाहतूक करणाऱ्या पालिकेच्या 16 वाहनांवर हे सीसीटीव्ही बसवले जाणार असून त्याचे लाइव्ह फुटेज विभाग प्रमुखांना पाहता येणार आहे. अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी ही माहिती दिली.
अनधिकृत पथारी व्यावसायिकांसह, नियमांचा भंग करणाऱ्या अधिकृत पथारी व्यावसायिकांवरही कारवाई केली जात आहे. या व्यावसायिकांचे साहित्य जप्त करून पालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयांचे गोडाऊन तसेच बालेवाडी येथे ठेवले जाते. हे साहित्य संबंधित पथारी व्यावसायिक दंड भरून सोडवून घेतात.
मात्र, अनेकदा हे जप्त केलेले साहित्यच सापडत नाही. अनेकदा हे साहित्य परस्पर विक्री केल्याचे तसेच कारवाईत जप्त केल्यानंतर गोडाऊन पर्यंत जातच नसल्याचे प्रकार समोर आले आहे. कारवाई नंतर माल परत घेण्यासाठी गेलेल्या पथारी व्यावसायिकांना हे अनुभव आले आहेत. तर कारवाईसाठी गेलेले पथकही अनेकदा प्रभावी कारवाई न करता दिवसभर वेळकाढत असल्याचेही समोर आले आहे.
त्यामुळे या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांची गोडाऊन तसेच शहरात 9 ठिकाणी असलेल्या अतिक्रमण साहित्याच्या गोडाऊनमध्ये हे सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत.