गेल्यावर्षी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआयएने मोठा उलगडा केला असून या हल्ल्याच्या कटाची पूर्ण माहिती असलेल्या बापलेकीस अटक केली आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, तारिक अहमद शाह व त्याची मुलगी इन्शा जान यांना अटक करण्यात आली असून दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्य़ात हाक रीपोरा येथे ते राहतात.
जैश ए महंमदचा दहशतवादी अदिल अहमद दर याने केंद्रीय राखीव पोलिस दल म्हणजे सीआरपीएफच्या वाहन काफिल्यावर स्फोटकांनी भरलेली मोटार धडकावल्याच्या घटनेची चित्रफीत तेथेच चित्रित करण्यात आली होती. ही चित्रफीत पाकिस्तानने हल्ल्यानंतर प्रसारित केली होती.
शाह हा व्यवसायाने ट्रक चालक असून त्याच्या घराचा वापर दर महंमद उमर फारूख हा पाकिस्तानी दहशतवादी तसेच कामरान हा आयइडी निर्माता तसेच आणखी दोन पाकिस्तानी दहशतवादी समीर अहमद दर व इस्माइल उर्फ इब्राहिम उर्फ अदनान असे सर्वच जण करीत होते. शाह याने या दहशतवाद्यांना त्याच्या घरात आश्रय दिला होता. तेथेच त्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलावर हल्ल्याचा कट रचला होता. अदिल अहमद दर याने केलेल्या या आत्मघाती हल्ल्याची जी चित्रफीत जैश ए महंमदने पुलवामा हल्ल्यानंतर प्रसारित केली होती ती त्यांनीच चित्रित केली होती.
बापलेकीच्या अटकेने पुलवामा हल्ल्याच्या चौकशीला वेगळी दिशा मिळाली असून यातील पाच प्रमुख व्यक्तींना सुरक्षा दलांनी यापूर्वीच चकमकीत ठार केले आहे, ते कट करणारे प्रमुख सूत्रधार होते.
समाजमाध्यमांवरून दहशतवाद्यांशी संपर्क
इन्शा जान (वय२२) हिने दहशतवाद्यांना अन्न व इतर रसद पुरवठा केला. २०१८-१९ या काळात हे दहशतवादी १५ वेळा त्यांच्या घरी होते, तेव्हा तिने त्यांची बडदास्त ठेवली होती. प्राथमिक चौकशीत इन्शा जान हिने असे मान्य केले, की ती पाकिस्तानी बॉम्बनिर्माता महंमद उमर फारूख याच्या सतत संपर्कात होती. ती नेहमी त्याच्याशी दूरध्वनीवर बोलत असे. समाज माध्यमांवरूनही तिचा संपर्क होता.