नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मंगळवारी सकाळी हेल्मेट परिधान न केलेल्या आणि वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलासंह एकूण ९४ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे परीक्षेसाठी निघालेले दहावी, बारावीचे बरेच विद्यार्थी अडकून पडल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला. आरटीओकडून मात्र कारवाई झालेल्यांत दहावी, बारावीचे विद्यार्थी नसल्याचा दावा करण्यात आला.
‘आरटीओ’च्या नागपूर शहर कार्यालयातील वायूवेग पथकाने आज मंगळवारी सकाळपासून सेमिनरी हिल्स परिसरातील बालोद्यान परिसरात हेल्मेट परिधान न केलेल्या आणि वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर अचानक कारवाई अभियान सुरू केले. याचा फटका दहावी व बारावीची परीक्षा देण्यासाठी निघालेल्या व नियम मोडणाऱ्यांना बसला. त्यांना परीक्षा केंद्रावर पोहचायला विलंब झाला.
हा प्रकार व्हिडिओत टिपून अजय मेश्राम यांनी समाजमाध्यमांवर व्हायरल केला. दरम्यान, आरटीओच्या या कारवाईत ७७ मोटारसायकल आणि १७ इतर वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई केली गेली. परंतु त्यात एकही दहावी व बारावीतील विद्यार्थी नसल्याचे कारवाई करणाऱ्या आरटीओच्या चमूचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने स्थापित रस्ता सुरक्षा समिती आणि उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. यात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना त्रास झाल्याबद्दल अद्याप कुणीही तक्रार केली नाही. त्यानंतरही या व्हिडीओतील अजय मेश्राम यांना शोधण्याचा प्रयत्न करून त्यात काही अनुचित आढळल्यास योग्य कार्यवाही करू, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले.