मुंबई: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेत मुंबईची भाषा हिंदी असल्याचं दाखवल्यानं वाद निर्माण झाल्यानंतर मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. मोदी यांनी ट्विट करत बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
‘मुंबई महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे यात काही वादच नाही…मी भारतीय आहे. महाराष्ट्रीयन आहे, गुजराती पण आहे… सर्व भाषांचा मी आदर करतो… जय हिंद’, असं ट्विट करून असित मोदी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच मोदी यांनी आणखी एक ट्विट करत सर्व भाषा आपल्या राष्ट्रभाषा आहेत, प्रत्येक भारतीय भाषेचा आदर आणि सन्मान व्हायला हवा. आपण सर्व भारतीय आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे. असित मोदी यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिलं असलं तर माफी मागितली नाही.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. मालिकेतील या भागात जेठालालचे वडील म्हणेजच बापुजी मुंबईची भाषा हिंदी असल्याचं सोसायटीतील इतर सदस्यांना सांगताना दिसत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर अक्षेप घेतला असून सब टीव्हीनं याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली आहे.

अधिक वाचा  पेरिविंकलचा विराज मनोज जरांगेंच्या भूमिकेत; “आम्ही जरांगे” या चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात 14 जून रोजी प्रदर्शित होणार