नवी दिल्ली: न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाचा कसोटी मालिकेत २-० असा पराभव झाला. दौऱ्यात भारतीय संघाने टी-२० मालिका जिंकली त्यानंतर मात्र न्यूझीलंड संघाने वनडे आणि कसोटी मालिकेत वर्चस्व राखले. संपूर्ण न्यूझीलंड दौऱ्यात भारताचा कर्णधार आणि रन मशीन विराट कोहली धावा करण्यात अपयशी ठरला. विराटच्या या कामगिरीवर अनेकांनी टीका केली. भारताच्या माजी कर्णधाराने विराटला या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा उपाय सुचवला आहे.
न्यूझीलंड दौऱ्यात विराटने फक्त २१८ धावा केल्या. दोन्ही कसोटी सामन्यात त्याची कामगिरी खराब झाली. यावर माजी कर्णधार कपील देव यांनी विराटला अधिक सराव करण्याचा सल्ला दिला आहे. वय वाढत असताना अधिक सराव करण्याची गरज असते, असे कपील देव म्हणाले.
वृत्तवाहिनीशी बोलताना देव म्हणाले, विराटने आता तिशी ओलांडली आहे. वयाचा परिणाम तुमच्या खेळावर होत असतो. तसाच तो तुमच्या नजरेच्या क्षमतांवर परिणाम होत असतो. इन स्विंग चेंडू ही विराटची ताकद होती. ज्यावर तो चेंडू फ्लिक करायचा अशाच चेंडूवर तो दोन वेळा बाद झाला. मला वाटते त्याने आय साइड बाबत थोडी काळजी घेतली पाहिजे.
जेव्हा मोठे खेळाडू आत येणाऱ्या चेंडूवर LBW होतात. तेव्हा त्यांना अधिक सराव करण्याची गरज असते. तुमची ताकद कमी पडल्यामुळे असे होत असते. १८ ते २४ वर्षापर्यंत आय साइड सर्वोत्तम असते. ती सर्वोत्तम राहण्यासाठी तुम्ही काय करता यावर गोष्टी अवलंबून असतात, असे कपील देव म्हणाले.