पुणे – उरुळी देवाची येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शहराच्या उर्वरीत भागात असलेल्या प्रकल्पांत क्षमतेपेक्षा अधिक कचऱ्यावर प्रक्रिया करा अशा सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी संबंधित ठेकेदारांना दिल्या आहेत.
‘राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणा’च्या (एनजीटी) निर्णयानुसार उरुळी देवाची – फुरसुंगी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये कचऱ्याचे ओपन डंपींग बंद करण्यात यावे, यासाठी तेथील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे.
महापालिका प्रशासन तेथील आंदोलक ग्रामस्थांशी चर्चा करत आहेत. या चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या असून, मंगळवारी पुन्हा एकदा ग्रामस्थांबरोबर चर्चा करण्यात येणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. महापौर मोहोळ आणि इतर पदाधिकारी, तसेच महापालिका प्रशासनाने ग्रामस्थांना वस्तुस्थिती समजावून सांगितली आहे तसेच त्यांच्याकडे एप्रिलपर्यंतची मुदत मागितली आहे. दरम्यानच्या काळात महापालिकेचे इतर भागातील नवे प्रकल्प पूर्ण होतील, त्यानंतर या ठिकाणी कचरा आणला जाणार नाही, असे आश्वासन ग्रामस्थांना दिल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
दरम्यान, याप्रश्नावर मध्यममार्ग काढण्यासाठी महापौर मोहोळ यांनी शहरात विविध ठिकाणी असलेल्या प्रकल्प चालकांची सोमवारी बैठक घेतली. प्रकल्पांची क्षमता, तेथे प्रक्रिया केल्या जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण याची माहिती त्यांनी घेतली. याप्रत्येक प्रकल्पात क्षमतेपेक्षा जास्त कचऱ्यावर प्रक्रिया सुरू करावी, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या असून, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मोहोळ यांनी नमूद केले.