पुणे : माणसांचे मागासलेपण हे मातीत नसुन विचारात असते. आपण जसा विचार विचार करतो तसे घडत असतो. त्यामुळे विचार बदलून ते प्रत्यक्ष कृतीमध्ये परावर्तित केल्यानंतर कुठल्याही क्षेत्रातील यश सहज शक्य आहे. या जगात काहीच अशक्य नाही हे सिद्ध करण्याची धमक मराठवाड्यातील प्रत्येक नागरिकांमध्ये आहे. मराठवाडयातील वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर झालेल्या अनेकांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे मराठवाडा दुष्काळग्रस्त असला तरी मागास नाही तर वैभवशाली आहे. मराठवाड्याची वैभवशाली परंपरा ज्ञान आणि कष्टाच्या जोरावर यश मिळविण्यासाठी आत्मसात करा असे परखड मत मराठवाडा समन्वय समितीचे संस्थापक राजकुमार धुरगुडेपाटील यांनी व्यक्त केले.
मराठवाडा मित्र परिवार आणि मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने रेनबो इंटरनेशनल स्कूल लोणी काळभोर याठिकाणी स्नेहमेळावा, चर्चासत्र आणि मराठवाड्यातील भूमिपुत्रांचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी,मराठवाडा समन्वय समिती संस्थापक राजकुमार धुरगुडेपाटील, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, उदोजक डी डी पवार, प्रा. व्यंकटेश रणखांब, जनार्धन शिंदे,परिवर्तन शिक्षण संस्था संस्थापक शोभा लगड, समाजसेविका नीता भोसले, मराठवाडा मित्र परिवार संस्थापक रवी पाटील, मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान संस्थापक महेश टेळेपाटील आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना राजकुमार धूरगुडेपाटील म्हणाले, ” आजच्या लोकशाही भारतामध्ये छत्रपती शिवराय यांनी दिलेला लोककल्याणकारी विचारांचा कृतिशील वारसा जोपासण्याचे प्रामाणिक काम मराठवाड्यातील प्रत्येक नागरिक करत आहे आहे. पुणे आणि परिसरामध्ये मराठवाड्यातून स्थलांतर करून विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यातून या कर्मभूमी मध्ये नावलौकीक केले आहे. आपण सर्वजण शेतकऱ्यांची मुले आहोत त्यामुळे ज्ञान, सातत्य, चिकाटी आणि अहोरात्र कष्ट या चतुसूत्रीची मराठवाड्यातील मातीने दिलेली सर्वात मोठी देणगी आपल्याजवळ आहे. मराठवाड्याच्या मातीशी असलेली नाळ कायम ठेवत कर्मभूमीच्या उतराईमधून समाजाच देणं आपण फेडत आहोत. पुणे व परिसराचे आपल्या मराठवाड्यातील नागरिकांवर खूप मोठे उपकार आहेत, त्या उपकाराची जाण ठेवत आपण आपला उद्योग-व्यवसाय, नोकरी ,शिक्षण पुढे चालू ठेवत आपली कार्यसिद्धी पूर्ण करा.यावेळी प्रा. व्यंकटेश रणखांब, सुरेश बिराजदार,महेश टेळेपाटील, रवी पाटील यांनीही आपले विचार मांडले.
यावेळी मराठवाडा भूमिपुत्र लोट्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ. ओमकुमार हलिंगे यांना मराठवाडा आरोग्यरत्न, जेष्ठ बांधकाम व्यावसायिक विठ्ठल चव्हाण यांना मराठवाडा उद्योगरत्न, पोलीस प्रशासनातील सेवेसाठी एन्काऊंटर स्पेशलिस्ट पोलीस सहाय्यक निरीक्षक अंकुश माने आणि हडपसर क्राईम ब्रँच संजय चव्हाण यांना मराठवाडा समाजरत्न, युवा उदोजक महेश घाटे यांना मराठवाडा युवा उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमासाठी परमेश्वर साळुंखे, भरत शिवपुरे, किशोर पाटील, गणेश शेंडगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुण गाढवेआणि आभार शिवराज वाघ यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उद्योग, व्यापार, नोकरी, शिक्षण क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती होती.