अहमदनगर: इंदोरीकर महाराजांनी संतती नियमनाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ एका पेन ड्राइव्हमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हा रुग्णालयाच्या पीसीएनडीटी सल्लागार समितीला दिला आहे. त्यामुळे ही समिती या पेन ड्राइव्हमधील व्हिडिओ सायबर पोलिसांकडे तपासण्यासाठी देणार असून हा व्हिडिओ त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचाच निघाल्यास इंदोरीकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इंदोरीकर महाराजांनी संतती नियमनाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या पीसीएनडीटी सल्लागार समितीने काही व्हिडिओ शोधले होते. मात्र, त्यांना वादग्रस्त व्हिडिओ आढळून आला नव्हता. त्यानंतर अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी समितीने सायबर सेलकडे इंदूरीकर यांच्या कीर्तनाच्या व्हिडीओची सत्यता तपासण्यासाठी पत्र दिल होतं. अहमदनगर सायबर सेलकडून याबाबत समितीला अहवाल देत इंदोरीकरांचा वादग्रस्त विधान असलेला व्हिडीओ युट्युब वर उपलब्ध नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे अंनिसने त्याला आक्षेप घेत समितीकडे इंदोरीकरांविरोधातील पुरावे सादर करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात पीसीएनडीटी समितीची बैठक झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीमध्ये इंदोरीकर महाराज यांना देण्यात आलेली नोटीस व महाराजांनी दिलेला खुलासा यावर चर्चा झाली. तसेच या प्रकरणासंदर्भात अंनिसने दिलेल्या पुराव्यांवरही चर्चा झाली. यावेळी इंदोरीकर यांचे कीर्तन असणारे काही व्हिडिओ एका पेन ड्राईव्हमध्ये अंनिसने समितीला दिले असल्याचा मुद्दा समोर आला. त्यावर हे व्हिडिओ नगर जिल्ह्यातील आहेत का दुसऱ्या जिल्ह्यातील? त्याची सत्यता कितपत आहे? याची तपासणी करण्यासाठी ते सायबर पोलिसांकडे देण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
काय आहे पेन ड्राइव्हमध्ये?
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेल्या पेन ड्राइव्हमध्ये इंदोरीकर महाराज यांच्या वक्तव्याचा संदर्भात असणारे पुरावे देण्यात आले आहेत. त्यामध्ये इंदोरीकर महाराजांनी दोन ठिकाणी केलेल्या कीर्तनाचे व्हिडिओ आहेत. हे व्हिडिओ नगर जिल्ह्यातील नसल्यास ते ज्या जिल्ह्यातील आहेत, तेथील पीसीएनडीटी सल्लागार समितीकडे या प्रकरणाचा तपास देण्याचा विचारही समितीच्या बैठकीमध्ये समोर आल्याचे सूत्रांकडून समजते.

अधिक वाचा  पवारांच्या बालेकिल्ल्यात ‘मंत्रिपद’ सुळेंच्या जिव्हारी?; सुळे यांनी असे डिवचलं, मोहोळांचाही सडेतोड पलटवार