भारतातील अस्पृश्यता निवारणाविषयी केलेल्या विधानावरून अभिनेते शरद पोंक्षे यांच्यावर टीका होऊ लागली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्यापाठोपाठ राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पोंक्षे यांच्यावर निशाणा साधला आहे. आव्हाड यांनी एक ट्विट केलं असून, ‘हा डोक्यावर पडला काय?,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
देशातील अस्पृश्यता निवारणाबाबत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलेल्या मतामुळे विवादाला तोंड फुटले आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘मी सावरकर’ वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात अभिनेते शरद पोंक्षे बोलत होते.
कार्यक्रमात बोलताना अभिनेते शरद पोंक्षे यांनी सावरकरांचं योगदान श्रेष्ठ असल्याचं म्हटलं. “अस्पृश्यता निवारणात सावरकरांचं मोठं योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यापेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे. डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले हे त्या-त्या जातीत जन्माला आल्यानं त्यांना अपमानाचे चटके बसले. त्यामुळे विद्रोह करत प्रवाहाविरोधात लढले. मात्र अस्पृश्यतेचा कोणताही चटका बसला नसतानाही सावरकर ब्राह्मणाविरोधात उभे राहतात. समाजातील जातीच्या भिंती फोडण्यासाठी आयुष्य व्यतीत करतात. त्यामुळे दोन्ही राष्ट्रपुरुषांपेक्षा सावरकर श्रेष्ठ आहे,” असा दावा पोंक्षे यांनी केला होता.
पोंक्षे यांनी केलेल्या विधानानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. “अस्पृश्यता निवारणात आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ : शरद पोंक्षे… हा डोक्यावर पडला काय बोलतो त्याचे त्यालाच कळते कि नाही माहित नाही,” अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
मिटकरींनी काय दिला सल्ला?
अस्पृश्यता आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी शरद पोंक्षे यांनी केलेल्या वक्तव्याला राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं आहे. मिटकरी यांनी यासंदर्भात ट्विट करून टीका केली आहे. “पोंक्षे, म. फुलेंनी तुमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार केलाय. फुले आणि बाबासाहेबांचा द्वेष करणारी तुमची हलकट प्रवृत्ती जाता जात नाही. आजारपणामुळे डोक्यावर परिणाम झाल्याचे जाणवते आहे. औषध वेळेवर घेत चला. वेळेवर दवापाणी नसलं की मेंदूवर परिणाम होतो,” असा उपरोधिक सल्ला मिटकरींनी पोंक्षे यांना दिला आहे.