पुणे – पुणे शहराचा चौफेर विकास होत आहे. दोन महानगरपालिकांमुळे लोकसंख्या वाढली आहे. आगामी काळातही पुण्यात उद्योग-व्यवसाय वाढण्याची शक्‍यता असल्यामुळे पुणे विस्तारत जाणार आहे. या परिस्थितीमध्ये पुण्याच्या वाहतुकीवर येणारा अनावश्‍यक ताण कमी करण्यासाठी प्रस्तावित रिंग रोड लवकर पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
पुणे, औद्योगिक आणि व्यापारी शहर असल्यामुळे पुणे शहर औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक या शहरांशी महामार्गांनी जोडले गेले आहे. त्यामुळे बाहेरच्या मोठ्या शहरातून येणाऱ्या ट्रक पुण्यातून जात असल्यामुळे पुण्याच्या वाहतुकीवर ताण पडतो. ते म्हणाले की, रोज पुण्याकडे 50 हजार ट्रक्‍स येतात. त्यातील केवळ 20 हजार ट्रक्‍स पुण्याशी संबंधित वाहतूक करत असतात. तर रोज 30 हजार ट्रकना इतर शहराकडे जायचे असते. मात्र, पर्यायी मार्ग नसल्यामुळे या अतिरिक्त 30 हजार ट्रक पुण्यातून जातात. त्यामुळे पुण्याच्या वाहतुकीवर आणि पर्यावरणावर परिणाम होतो.
यासाठी लवकर रिंगरोड होणे आवश्‍यक आहे. मात्र, यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन आणि गुंतवणूक लागणार आहे. प्रस्तावित रिंग रोड तब्बल 120 किलोमीटरचा असणार आहे व त्यामध्ये 4 लेनच्या दोन बाजू असणार आहेत. एवढा मोठा प्रकल्प एकदाच सुरू करणे शक्‍य नसल्यामुळे तो 3 टप्प्यात सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात नगर, सातारा रोडवरील रिंग रोडचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.
रिंग रोड साठी तब्बल 1,400 हेक्‍टर जमीन लागणार आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये जमीन मिळवणे अवघड असल्यामुळे आम्ही अतिरिक्त फायद्याचे प्रस्ताव जमीन मालकाकडे दिले आहेत. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. हा रिंग रोडचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर इतर टप्पे अधिक वेगाने पूर्ण होऊ शकतील, असे ते म्हणाले.

अधिक वाचा  अंगणातील दिडवर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला गिन्नी गवतात केलं  ठार; पूर्ण गावावर शोककळा, शेतकरी संतप्त