राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनेचा छळ केल्याप्रकरणी विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित, दुसरा मुलगा आनंद आणि त्यांची पत्नी शीतल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, यामुळे आता विद्या चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
याप्रकरणी विलेपार्ले पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात १६ जानेवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. सूनेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ४९८ अ, ३५४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पहिल्या मुलीनंतर दुसरीही मुलगी झाल्यानं कुटुंबीयांनी छळ केल्याचा आरोप त्यांच्या सूनेकडून करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चव्हाण कुटुंबीयांचाही जबाब नोंदवून घेतला आहे. तर दुसरीकडे विद्या चव्हाण यांनी या आरोपांचं खंडन केलं आहे.