नवी दिल्लीः सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली सर्व सोशल मीडिया अकाउंट्स बंद करणार आहेत. खरं आहे का हे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हा प्रश्न पडण्याचं कारण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं एक ट्विट. रविवारपासून सोशल मीडियातू एक्झिट घेण्याचा विचार करतोय, असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलंय. मोदींच्या या ट्विटमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब ही सोशल मीडिया अकाउंट येत्या रविवारपासून बंद करण्याचा माझा विचार आहे, असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलंय. यामुळे सर्वत्र वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मोदींचे ट्विटरवर ५३.३ मिलिअन फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर ४४, ५९७, ३१७ जण त्यांना फॉलो करतात. तर इन्स्टाग्रामवर त्यांचे ३५.२ मिलिअन फॉलोअर्स आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालंय. त्यावर चर्चाही रंगू लागल्या आहेत. आता राजकीय नेते यापासून कसे दूर राहणार? मोदींच्या ट्विटवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी कमेंट केलीय. सोशल मीडिया सोडू नका, असं राहुल गांधीं म्हटलंय. मोदींनी सोशल मीडिया सोडलं तर त्यांच्यावर टीका करणं बंद करणार नाही, असं राहुल यांनी स्पष्ट केलंय. ‘द्वेष करणं सोडा, सोशल मीडिया अकाउंट बंद करू नका’, असं राहुल गांधी म्हणालेत. तर शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या ट्रोल गँगलाही पंतप्रधान मोदी हा सल्ला देणार का? असा सवाल करत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींवर निशाणा साधलाय.
मोदींचे यश आणि सोशल मीडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय यशात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान ह्या वेगवान राजकीय प्रवासात सोशल मीडियाची त्यांना मोठी मदत झाली. राजकीय विश्लेष सोशल मीडियावरील त्यांच्या सक्रियतेलाही महत्त्वाचे मानतात. गुजरातचे मुख्यमंत्री असताना सोशल मीडियावरून त्यांची लोकप्रियता वाढली होती. सोशल मीडियावरील मोदींची वाढती लोकप्रियता पाहून अनेक नेत्यांना सोशल मीडियाची वाट धरली. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवेळी उमेदवारांची नावांची घोषणाही सर्व राजकीय पक्ष सोशल मीडियावरच करतात.

अधिक वाचा  प्रत्येकी 300 युनिट मोफत वीज पुरविण्याचे लक्ष्य या योजनेची प्रभावी अंमलबजावणी; 1 कोटी घरांना फायदा