मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यकर्ता शिबिरावर टीका करणाऱ्या भाजपवर राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे. पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय, असा मार्मिक टोला धनंजय मुंडे यांनी भाजपला लगावला आहे.
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यावर टीका केली होती. राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात मुंबई पालिकेत ६० जागा जिंकू. तर, दुसरे नेते म्हणतात ५० जागा जिंकू. मुळात राष्ट्रवादीच्या आहे त्या ८ जागा टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याचं इतर प्राण्यात रुपांतर होत नाही. ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर. विनोदीच आहे सगळं! पालिकेत अबकी बार भाजपा सरकार!, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी ट्विट करून राष्ट्रवादीवर टीका केली होती. शेलार यांच्या या टीकेचा धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारेच खरपूस समाचार घेत मार्मिक टीका केली आहे. पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय, असं एका ओळीचं ट्विट करत मुंडे यांनी शेलार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
राष्ट्रवादीचं ‘मिशन नंबर-२’; मुंबई पालिकेसाठी केला ‘हा’ प्लान
त्यामुळे आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीचाही सामना करावा लागणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुका दोन वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने जय्यत तयारी सुरू केली आहे. मुंबईत राष्ट्रवादीला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनविण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्वच बड्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादीने मुंबईत किमान ५० ते ६० जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला यात यश मिळतं का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अधिक वाचा  नगर लंके विजयानंतर ‘मुरब्बी नेता’ अजितदादांच्या भेटीस, सगे-सोयऱ्यांच्या राजकारणातील प्रमुख, मोठा विषय सुरू?