रत्नागिरी: नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज नाणारवरून थेट ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच त्यांच्या टीकेचा रोख मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडेही होता.
नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शिवसेनेचा रविवारी राजापूरमधील सागवे कात्रादेवीवाडी कोचाळी मैदानावर मेळावा झाला. त्यानंतर आज नाणार प्रकल्पाच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केले. रिफायनरीच्या समर्थनार्थ डोंगर तीठा येथे मेळावा तसेच सत्यनारायणाची पूजाही आयोजित करण्यात आली होती. या मेळाव्यात बोलताना प्रमोद जठार यांनी नाणारला विरोध करणाऱ्या शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला.
‘नाणार रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येथे येऊन सांगून गेले असले तरी प्रत्यक्षात सत्य वेगळंच आहे. नाणार प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनी ठाकरे बंधूंच्या नातेवाईकांनी खरेदी केल्या आहेत, असा थेट आरोप करतानाच हवे असल्यास याबाबतचे पुरावे द्यायलाही मी तयार आहे’, असे जठार यांनी सांगितले.
नाणार प्रकल्प रद्द करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी येथील जनतेला शब्द दिला होता. आता ते मुख्यमंत्री झाले तरी त्यांच्या तो शब्द कायम आहे. यापुढे या प्रकल्पाला जे कोणी शिवसैनिक पाठिंबा देतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देतानाच सागवे येथील शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य मंदा शिवलकर यांनी नाणार प्रकल्पाला पाठिंबा दिल्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत असल्याचेही खासदार विनायक राऊत यांनी रविवारच्या मेळाव्यात स्पष्ट केले होते. शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेऊन नाणार प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. हा इशाराच समजावा. जो कोणी या नाणारचं समर्थन करेल, त्याला झोडून काढा, असंही राऊत यांनी भरसभेत सांगितलं. तर पालकमंत्री उदय सामंत यांनीही काहीही झाले तरी नाणार प्रकल्प होणार नाहीच, असं स्पष्ट केलं.

अधिक वाचा  भोर–वेल्हा–मुळशी ”लकी ड्रॉ आणि वाटप’मध्ये माननीयांची एंट्री; लाडक्या बहिणीला साडी नव्हे थेट 4 चार चाकी गाडी