‘ऑस्कर’ आणि ‘गोल्डन ग्लोब’ सारख्या नामांकित पुरस्कारांवर नाव कोरणारी लेडी गागा जगातील सर्वोत्कृष्ट संगीतकांरांपैकी एक म्हणून ओळखली जाते. लेडी गागा गायनासोबतच अभिनेत्री म्हणूनही लोकप्रिय आहे. परंतु गेल्या काही काळात ती आपल्या गाण्यांपेक्षा अधिक चित्रविचित्र विधानांमुळे जास्त चर्चेत राहू लागली आहे. अलिकडेच तिने एका मुलाखतीत “मी दिवसाला तब्बल ४० सिगारेट ओढते” असे सांगितले.
लेडी गागाच्या सिगारेट ओढण्यात गैर काय?
आता तुम्ही म्हणाला जगभरातील अनेक सेलिब्रिटी धूम्रपान करतात. मग लेडी गागाने केले तर त्यात गैर काय? तिच्या चाहत्यांमध्ये गोंधळ का माजला? खरं तर लेडी गागा लोकांना No Smoking चे धडे देते. धूम्रपानापासून लोकांना दूर नेणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेची ती ब्रँड अबेसिडर आहे. या संस्थेमार्फत ती लोकांना धूम्रपान न करण्याचा सल्ला देते. त्याचे दुष्परिणाम सांगते. परंतु त्याचबरोबर दुसरीकडे स्वत: मात्र दिवसाला सरासरी ४० सिगारेट ओढते. त्यामुळेच लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशा आशयाचे स्टेटस टाकून काही लोक सोशल मीडियाव्दारे तिच्यावर टीका देखील करत आहेत.
धूम्रपान हे आरोग्यासाठी घातक आहे. धूम्रपानाचा थेट संबंध कर्करोगाशी आहे. शिवाय धूम्रपान हे उच्च रक्तदाबापासून ते ह्रदयविकाराच्या झटक्यापर्यंत विविध आजारांना कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे डॉक्टर देखील धुम्रपान न करण्याचा सल्ला देतात. परंतु डॉक्टरांच ऐकतं कोण? तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने दरवर्षी जगभरात ५५ लाख तर भारतात १० लाख नागरिकांचा मृत्यू होतो.