जगाची महासत्ता म्हणून ओळखली जाते, त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दिल्लीत येतात, एकीकडे त्यांचं स्वागत आपण करतो दुसरीकडे त्याच शहरात भारतीयांमधील एका वर्गावर हल्ले केले जातात. याचा अर्थ हा आहे की, एका मोठ्या संकटाला तोंड देण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. याचं कारण एकच आहे, अलिकडील काळात ज्या सर्व निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत जनतेची लोकसभा निवडणुकीच्या वेळी घेतलेल्या निर्णयापेक्षा, आज वेगळ्या दिशेने जाण्याची मनस्थिती दिसायला लागलेली आहे. परिणामी आज सत्ताधारी समाजात अंतर निर्माण करून त्याचा लाभ कसा घेता येईल, या प्रकारचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केला.मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.
यावेळी पवार म्हणाले, देशासमोर आज जे प्रश्न आहेत, त्याबद्दलची चिंता देशभरातील सर्व घटकांमध्ये निर्माण झाली आहे. तशी स्थिती या ठिकाणी कधी होणार नाही. ज्या शक्ती आज सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना दूर ठेवण्यासाठी काय आवश्यकता आहे, काय पर्याय आहेत याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे.
आपण गेले काही दिवस बघत आहोत, देशाच्या राजधानीला आग लागली आहे. दिल्ली शहर हे अनेक भाषिकांचं, धर्मीयांचं, विविध राज्यांमधुन आलेल्या नागरिकांचं असं एक महत्वाचं शहर आहे. विधानसभेची निवडणूक झाली, खरं म्हटलं तर त्या निवडणुकीपासूनच आज सत्ताधारीपक्ष जो देशात आहे, त्यांना जनतेचा पाठिंबा मिळण्याची चिन्ह दिसत नव्हती. ज्यावेळी सत्ता आणि लोकांचा पाठिंबा मिळत नाही त्यावेळी सांप्रदायिक विचारांचा आधार घ्यायचा, समाजात फूट पाडायची आणि जातीय व धार्मिक वातावरण तयार करून त्याचा लाभ घ्यायाचा यासंबंधीचे प्रयत्न सुरू झालेले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्लीच्या निवडणुकीत फारसं लक्ष दिलं नाही. परंतु, आपण एक भूमिका घेतली. किमान केजरीवाल यांच्या नेतृत्वात भाजपाला पर्याय देण्यासंबंधीची एक स्थिती निर्माण होती, त्याला मदत करता आली तर ती मदत केली पाहिजे. निवडणुका झाल्या आपण अनेकांची भाषणं निवडणुकीत ऐकतो. परंतु या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, केंद्र सरकारमधील मंत्री या सर्वांचा प्रचाराचा रोख हा देशाच्या सामाजिक व धार्मिक ऐक्याला छेदणारा, दूर करणारा अशा प्रकारचा होता, असा आरोपही यावेळी पवारांनी केला.
पवार म्हणाले, मला आश्चर्य वाटलं जेव्हा पंतप्रधान मोदींनी त्या ठिकाणच्या भाषणात सांगितलं, आपल्याला विरोध करणारे, भाजपा विरोधात शक्ती उभी राहते आहे त्यामध्ये कोण आहे, याची चौकशी करण्याची गरज नाही. कारण, त्याच्या डोक्यावरची टोपी, त्याचा पेहराव आपल्याला सांगतो ते कोण आहे. देशाच्या पंतप्रधान पदावरील व्यक्तीनं समाजाता तेढ निर्माण होईल अशाप्रकारचं वक्तव्य करणं ही अतिशय चिंतेची बाब आहे. मिळालेले अधिकार मिळालेली सत्ता ही संबंध देशातील सर्व घटाकांच्या रक्षणासाठी वापरायच्या ऐवजी मंत्रिमंडळातील केंद्र सरकारचे मंत्री ‘गोली मारो’ या प्रकारची वक्तव्य करतात व अन्य समाजात एकप्रकारची दहशत निर्माण करणयाचा प्रयत्न करतात. याच्या इतकी निंदनीय गोष्ट या देशात कधी घडली नव्हती.
याचबरोबर भाषणाच्या सुरुवातीस कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यसाठी देखील मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, कुठल्याही राजकीय पक्षाच्या जीवनात चढउतार असतात. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एका संघर्षाच्या व अडचणीच्या काळातून आपण सर्वजण जात होतो. मात्र तुम्ही सर्वांच्या सामूहिक कष्टामुळं आपण पुन्हा एकदा पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न केला व त्यामध्ये तुम्हाला यश आलं. राज्य प्रस्थापित करायला तुम्हाला यश आलं. महाराष्ट्रात काही समान कार्यक्रमावर सत्ता प्रस्थापित करण्यात आपण सर्वजण यशस्वी झालो. राज्य पुढे कसे नेता येईल, पक्ष कसा मजबूत करता येईल याचा आपण प्रयत्न करतो आहोत, असंही ते कार्यकर्त्यांना उद्देशुन यावेळी म्हणाले.

अधिक वाचा  NDA च्या पहिलाच भाषणात नितीश कुमार ‘असं’ का म्हणाले?, PM मोदींना जोरदार चिमटे!