मुंबई : राष्ट्रवादी आणि भाजपच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या ‘ट्विटर वॉर’ सुरू आहे. ‘तुमचे दात जास्तच दिसताहेत ते सांभाळून ठेवा कधी घशात जातील याचा नेम नाही.’ असं ट्वीट करुन भाजपच्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला होता. आता रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला आहे.
‘आमच्या दाताचे आणि घशाचे विषय किरकोळ आहेत, आपण ज्यांच्यासाठी पक्षातून उडी मारलीत तेवढंच आठवा, आजही पळता भुई कमी होईल…. हिशोबात. झाकली मूठ सव्वा लाखाची..’ असं ट्वीट रुपाली चाकणकर यांनी ‘दलबदलू’ या हॅश टॅगने चित्रा वाघ यांना टॅग केलं आहे. नरेंद्र मेहतांवर कारवाई करणार का, असा सवालही रुपाली चाकणकर यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
रूपाली चाकणकर यांनी ट्वीट करून भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि माजी मुख्यमंत्री तसंच सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. ‘आपल्या पक्षाच्या या विकृती आपल्याला सगळ्यांना भाजपचे संस्कार दाखवतात. की, येथेही आपण आरोपीला क्लिनचीट देणार आहात?’ असा सवाल करत त्यांनी फडणवीसांवर टीका केली होती. तसेच चित्रा वाघ यांनाही याप्रकरणांत सामिल करून घेत आपण या प्रकरणी एवढ्या शांत का? असा प्रश्नही केला होता. ‘चित्रा वाघ तुमचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत का?’ असं चाकणकरांनी चित्रा वाघ यांना आपल्या ट्वीटमधून विचारलं होतं.
नंतर रुपाली चाकणकर यांच्या या सवालानंतर चित्रा वाघ यांनीही घणाघाती प्रत्युत्तर दिलं होतं. ज्याने गुन्हा केला असेल त्याला त्याची शिक्षा मिळेलच. नेत्यांच्या चुकीच्या गोष्टींचं समर्थन मी या अगोदरही केलं नाही आणि आताही करत नाही. आणि इथून पुढच्या काळातही मी चुकीच्याचे समर्थन कधीचं करणार नाही, असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.

अधिक वाचा  काँग्रेसची कुस्तीपटू विनेश फोगाटला संधी का चाल?; 15 वर्षांपासून जुलाना काँग्रेसला विजय मिळालेलाच नाही