बीड : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसताना दिसत आहे. अवकाळी पावसाचा ज्वारी गहू, हरभरा याबरोबरच फळ पिकांमध्ये आंबा, द्राक्ष, टरबुज यासारखा शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
1. बीड
बीड शहरात आज दुपारीच ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसंच हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
यामध्ये ज्वारी गहू हरभरा या बरोबरच फळ पिकांमध्ये आंबा,द्राक्ष टरबुज या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यातच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या वर्षी रब्बीचा पीक विमा मिळणार नाही. यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
2. कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाने हजरी लावली. गडहिंग्लज, आजरा शहरात चांगलाच पाऊस बरसला. पावसाचा आठवडी बाजारावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. ज्वारी, बटाटा या पिकांसह आंबा, काजूच्या उत्पादनावरही या अवकाळी पावसाचा परिणाम आहे. सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. बेळगावसह सीमाभागातही पावसाची हजेरी पाहायला मिळाली.
3. उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यात रात्री अवकाळी पाऊस पडला. पावसाने रब्बीमधील गहू ,ज्वारी या पिकाचे नुकसान केले. तसंच फळपिकालाही फटका बसला. अजूनही ढगाळ वातावरण कायम आज पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
4. सोलापूर
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे द्राक्षबागा संकटात आल्या आहेत, तर रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले.
5. वाशिम
मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात आणि मंगरुळपिर तालुक्यातील शेलुबाजार परिसरात रिमझिम पाऊस सुरू कोसळला. पावसाचा जोर वाढला तर रब्बीतील काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकाचं नुकसान होणार आहे.
6. नाशिक
काल सायंकाळी आणि रात्री झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नांदगांव तालुक्यातील अनेक भागात पिकांचे मोठे नुकसान झाले. कधी अवकाळी कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा एक ना अनेक संकटात शेतकरी सापडला असून एका पाठोपाठ एक नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांचा पिच्छा सोडत नाही. अशातच आणखी एक नैसर्गिक संकट काल सायंकाळी व रात्री नांदगांव तालुक्यातील शेतकऱ्यावर आले.
अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले. ऐन उन्हाळ्यात अचानक झालेला पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. पावसाचा फटका गहू, हरबरा व खळ्यात-मळ्यात उघडयावर काढून ठेवलेल्या कांद्याला बसला. अनेक ठिकाणी तर काढणीला आलेला गहू भुईसपाट झाला. तर कांदे भिजून खराब झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव बुद्रुक,जळगाव खुर्द,परधाडी,डॉक्टरवाडी, बाभूळवाडी या भागात पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.
7. अकोला
अकोल्यातील पातूर तालुक्यातील काही ठिकाणी ढगाळ वातावरणात हलक्या सरीचा पाऊस झाला. कापूस, हरभरा, गहू, कांदा आणि भाजीपाला या पिकांना धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे.
8. जळगाव
जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहर परिसरासह तालुक्यातील शेंदुर्णी नेरी भागात अवकाळी पावसाने तडाखा दिला.