लोणावळा – मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरुन एक्सप्रेस वे कडे जाणाऱ्या अंडा पॉईंट खंडाळा येथील तीव्र व धोकादायक वळणावर हा अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे पिठाची पोती घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटला. या अपघातात मुंबईहून पुण्याकडे येणारे तीन दुचाकीवरील सहा दुचाकीस्वार लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबले असता भरधाव टेम्पो त्यांच्या अंगावर पलटला.
भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. एक जण सुदैवाने बचावला आहे. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व दुचाकीस्वार पर्यटनासाठी अलिबाग येथे गेले होते तेथून पुन्हा (तळेगाव) पुण्याकडे परतत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला असून खंडाळा महामार्ग पोलीस त्याचा शोध घेत आहे.
अपघातामध्ये प्रदीप प्रकाश चोळे (वय 38), अमोल बालाजी चिलमे (वय 29), नारायण राम गुंडाळे (वय 27), निवृत्ती राम गुंडाळे (वय 30), गोविंद नलवाड (वय 35) या पाच जणांचा मृत्यू झाला असून बालाजी हरिश्चंद्र भंडारी (वय 35) हे सुखरुप बचावले आहेत. वरील सर्व जण हे लातूरचे असून तळेगावात कामाकरिता राहत होते. याप्रकरणी खोपोली पोलीस व बोरघाट पोलीस अधिकचा तपास करत आहेत.