पुणे – नदीपात्रातील महामेट्रो मार्गाच्या गर्डर लॉचिंगचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे. त्यासाठी या मार्गावर युद्धपातळीवर काम सुरू असून 59 मधील सुमारे 50 खांबांचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, महामेट्रोडून नदीपात्रात असलेल्या डेक्‍कन आणि संभाजी उद्यान या दोन स्थानकांचेही काम हाती घेतले असून सप्टेंबर 2020 पर्यंत ते पूर्ण करण्याचे नियोजन झाल्याची माहिती महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली.

महामेट्रोकडून वनाज ते गरवारे महाविद्यालय हा प्रधान्य मार्ग निश्‍चित केला आहे. त्या मार्गावर खांबांवर गर्डरलॉचिंग करून स्पॅन बसविण्याचे काम 95 टक्‍के पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता महामेट्रोने आपला मोर्चा नदीपात्रात वळविला आहे. नदीपात्रात स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक ते कॉंग्रेस भवनपर्यंत सुमारे 59 खांब आहेत. तसेच डेक्‍कन आणि संभाजी उद्यान या दोन स्थानकांचाही समावेश आहे.

अधिक वाचा  हार्दिक परत गेल्यानंतर जीत समोरील आव्हानं कोणती? सर्वाधिक चिंता ‘या’ गोष्टीची!

डेक्‍कन स्थानक हे डेक्‍कन पीएमपीएमएल बस स्थानकाजवळ नदी किनारी असून कर्वे रस्ता, खंडोजी बाबा चौक, फर्गसन कॉलेज रस्ता, आपटे रस्ता व जंगली महाराज रोडपासून जवळ असल्यामुळे या परिसरातील लोकांना त्याचा फायदा होणार आहे. तर दुसरे मेट्रो स्थानक संभाजी उद्यानाच्या नदीपात्राच्या बाजूला बांधण्यात येणार आहे. जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, आपटे रोड या अत्यंत गजबजीच्या भागाला हे मेट्रो स्थानक सुविधा पुरवेल.

जुन्या पेठ भागाला जोडण्यासाठी नदीवर पादचारी पूल

संभाजी उद्यान मेट्रो स्थानक शहराच्या जुन्या पेठ भागाला जोडण्यासाठी नदीवर पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. जेणेकरून ओंकारेश्‍वर मंदिर चौक, वर्तक उद्यान व शनिवार पेठ या जुन्या पेठ वस्तीच्या भागांना जोडणार आहे. त्यामुळे या दोन्ही स्थानकांचे कामही महामेट्रोकडून सुरू झाले असून या मार्गातील सुमारे 50 खांबांचे काम पूर्ण झाले असून केवळ स्थानके असलेले खांब पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे पूर्ण झालेले सर्व दोन आठवड्यात स्पॅनद्वारे जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे काम महामेट्रोने केले आहे. त्यामुळे स्पॅन लॉंचिंग झाल्यानंतर पावसाळ्यात महामेट्रोला मार्ग टाकता येणार आहेत. त्यानुसार, कामाचे नियोजन केले असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.