मुंबई; विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पार पडलेल्या सत्तांतराच्या खेळावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘मटा कलासंगम’च्या समारोपाच्या मुलाखतीत कठोर प्रहार केले. ‘निवडणुकीत कोण उभे राहिले, कोणी कोणाला मत दिले, कोण निवडून आले, कोण विरोधी पक्षात बसले, कोण सत्तेवर आले हे सगळेच अनाकलनीय होते. हा प्रकार पाहून यापुढे आपण कोणाला मत द्यायचे, का मत द्यायचे हा प्रश्न या राज्यातील जनतेला पडला तर नवल वाटायला नको’, अशी टिप्पणी त्यांनी केली.
अपना सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत महाराष्ट्र टाइम्स ‘कलासंगम २०२०’ या तीन दिवसीय साहित्य व सांस्कृतिक सोहळ्याचा समारोप रविवारी राज यांच्या मुलाखतीने झाला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. सध्या जोरात असलेल्या सोशल मीडियावरही त्यांनी भाष्य केले. ‘सोशल मीडिया आणि टेलिव्हिजनमुळे सगळा निवांतपणा हरवून बसला आहे. या दोन माध्यमांनी जगाची शांतता घालवली आहे. सोशल मीडियावरची माहिती खरी की खोटी याविषयी आपण ठोस सांगू शकत नाही. पूर्वी एमटीव्ही नावाचे चॅनेल होते. या चॅनेलवर वेगाने दृश्ये दिसत. तेव्हा तो वेग खूप वाटायचा. त्या वेगाहून सोशल मीडियाचा वेग कैकपटीने आहे. सोशल मीडियाचा सगळ्यांवर परिणाम होत आहे. त्यावर बंदी घालायची की नाही, हा नंतरचा प्रश्न आहे. परंतु त्याला मात देणारेही काही येऊ शकते. बेल बॉटमनंतर नॅरो बॉटम तसा परिणाम होऊ शकतो, अशी मांडणी त्यांनी केली. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक पराग करंदीकर यांनी राज यांचे स्वागत करताना ‘मटा कलासंगम’ यशस्वी केल्याबद्दल ठाणेकरांचे आभार मानले. निवासी संपादक श्रीकांत बोजेवार यांनी आभार प्रदर्शन केले.
राज यांची कोटी
आगामी दहा वर्षांत मनसेची वाटचाल कशी असेल व कुणाशी युती कराल, या प्रश्नावर राज यांनी त्यांच्या शैलीत कोटी केली. ‘सध्या आमचा पक्ष बॅचलर आहे. आम्हाला युतीचा ‘टच’ नाही. तो विचार आला, तरी आमच्या डोळ्यांत ‘टच’कन पाणी येतं’, या राज यांच्या वाक्यावर सभागृहात हशा पिकला.

अधिक वाचा  महाराष्ट्रात भाजपच सर्वात मोठ नुकसान मोठे फेरबदल? 2 कॅबिनेट 4 राज्यमंत्रीपद, नेमकी कुणाकुणाला संधी?