बेंगळुरु, 01 मार्च : भाजपचे कर्नाटकातील संकटमोचक म्हणून ओळख असलेले आणि आरोग्य मंत्री बी. श्रीरामुलु यांच्या मुलीच्या लग्नाची चर्चा सध्या देशभर रंगली आहे. या लग्नात होणारा खर्च हा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या समारंभातही झाला नसेल. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या या लग्नसोहळ्यामध्ये होणारा खर्च हा जनार्दन रेड्डी यांनी केलेल्या खर्चापेक्षा जास्त असणार आहे. नऊ दिवस हा लग्नसोहळा चालणार आहे. 2016 मध्ये जनार्दन रेड्डी यांनी मुलीच्या लग्नात 500 कोटी रुपये खर्च केले होते. त्यानंतर आता श्रीरामुलु 500 कोटी रुपये खर्च करणार आहेत.
आरोग्य मंत्री श्रीरामुलु यांची मुलगी रक्षिताचं लग्न हैदराबादमधील उद्योगपती रवी कुमार याच्याशी होणार आहे. या सोहळ्यामध्ये दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणार आहे. लग्नासाठी 500 पुजाऱ्यांना आमंत्रित केलं आहे. त्यांच्या मुक्कामाची सोय बेंगळुरुत करण्यात आली आहे. तसंच लग्नात 1 लाख पाहुण्यांना बोलवण्यात येईल. यासाठी खास पत्रिका छापल्या आहेत.
लग्नपत्रिका छापताना त्यात आरोग्याची विशेष काळजी घेतली आहे. केसर, कुंकू, हळद पावडर आणि अक्षता ठेवण्यात आल्या आहेत. श्रीरामुलु यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना निमंत्रण दिलं आहे. जवळपास 40 एकरात पसरलेल्या पॅलेस ग्राउंडवर हे लग्न होणार आहे.
लग्नासाठी गेल्या तीन महिन्यांपासून तयारी सुरु आहे. यात भव्य असा सेट उभारण्यात येत आहे. हम्पीच्या विरुपाक्ष मंदिरासह अनेक मंदिरांसारखा सेट उभारण्यात येणार आहे. मांड्यातील मेलुकोटे मंदिराच्या प्रतिकृतीचा खास सेट उभा करून त्याठिकाणी लग्न होणार आहे. यासाठी 200 लोकांना फक्त फुलांची सजावट करण्याच्या कामासाठी नेमलं आहे. बॉलिवूडमधील आर्ट डायरेक्टर हा सेट तयार करत आहेत. याशिवाय मुलीच्या मेकअपसाठी दिपिका पदुकोनचा मेकअप करणारी आर्टीस्ट आणि लग्नाच्या व्हिडिओ-फोटो शूटसाठी अंबानींच्या लग्नात काम केलेला फोटोग्राफर आहे.
कर्नाटकात भाजपचे संकटमोचक अशी श्रीरामुलु यांची ओळख आहे. जनार्दन रेड्डे आणि श्रीरामुलु यांनी कर्नाटकात अशक्य असलेलं भाजपचं सरकार स्थापन केलं. वाल्मिकी समाजातले असलेल्या श्रीरामुलु यांनी जनार्दन रेड्डी यांच्या साथीने काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांना फोडलं आणि येडियुरप्पा यांचं सरकार स्थापन केलं. या सरकारमध्ये त्यांना आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.